जादूटोण्याच्या नावाने लुबाडले
सीवूड्समधील महिलेकडून आठ वर्षांत एक कोटी २२ लाख उकळले; उत्तर प्रदेशातील भोंदू दाम्पत्याविरोधात गुन्हा
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : घरातील अडचणी आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत जादूटोणा, करणी आणि अघोरी शक्ती दूर करण्याच्या बहाण्याने उत्तर प्रदेशातील भोंदू दाम्पत्याने सीवूड्स येथील ५६ वर्षीय महिलेकडून तब्बल एक कोटी २२ लाख ५८ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल आठ वर्षे सुरू असलेल्या या फसवणूकप्रकरणी एनआरआय सागरी पोलिसांनी रहीशमिया आणि त्याची पत्नी अस्मा रहीशमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
तक्रारदार महिला सीवूड्स सेक्टर-४० येथे कुटुंबासह राहते. २०१७ मध्ये कौटुंबिक अडचणींमुळे ती तणावाखाली होती. याच काळात जालना येथे गेली असताना तिची एका बाबाशी भेट झाली. त्याने उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील बुंदा गावातील रहीशमिया आणि अस्मा रहीशमिया या दाम्पत्याची माहिती दिली. महिलेकडून संपर्क साधल्यानंतर दाम्पत्याने स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला. घरात करणी व अघोरी शक्ती असून, धार्मिक विधी न केल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी घातली.
सप्टेंबर २०१७ ते एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक व अघोरी विधी करण्याच्या नावाखाली महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. रोख रक्कम, एटीएम तसेच धनादेशाद्वारे पैसे घेत आरोपींनी तिच्याकडून सातत्याने रक्कम उकळली. त्यांच्या धमक्यांमुळे महिलेने सोन्याचे दागिने, शेतीची जमीन आणि स्वतःचे दुकानही विकले. त्यातून मिळालेली रक्कम आरोपींच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली.
आरोपींनी आणखी पैशांची मागणी केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३५१ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३ (१) व ३ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीतीचा गैरफायदा
कौटुंबिक अडचणींमुळे मानसिक तणावात असलेल्या महिलेच्या स्वभावाचा फायदा घेत आरोपींनी कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती निर्माण केली. त्यानंतर धार्मिक विधींच्या नावाखाली सातत्याने पैसे उकळण्यात आले.
मालमत्ता विकून दिली रक्कम
फसवणुकीचा कालावधी तब्बल आठ वर्षांचा आहे. आरोपींच्या धमक्या आणि भीतीमुळे महिलेने सोन्याचे दागिने, शेतीची जमीन तसेच स्वतःचे दुकान विकले. या सर्व व्यवहारांतून आरोपींनी एकूण एक कोटी २२ लाख ५८ हजार रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.