बांधकाम व्यावसायिकाला पाच लाखांचा गंडा
सहा जणांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : दीड कोटींचे प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे प्रलोभन दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाला सानपाडा येथे बोलावून पाच लाखांची रक्कम फिल्मी स्टाइलने लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट पोलिसांची कारवाई झाल्याचा बहाणा करत आरोपींनी ही लूट केली. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार रियाज अहमद खान (४२, रा. ठाणे) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात नाशिक येथील परिचयातील रोहन पाटील याने खान यांच्याशी संपर्क साधून प्रोजेक्ट लोनची गरज आहे का, अशी विचारणा केली होती. खान यांनी होकार दिल्यानंतर रोहनने कांतीलाल व किशनलाल नावाच्या व्यक्तींशी कॉन्फरन्स कॉलवर चर्चा घडवून आणली. कांतीलालने स्वतःची ओळख डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून करून देत १.५ कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. बँक मॅनेजरला देण्यासाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगून कांतीलालने खान यांना कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी प्रथम कल्याण येथे आणि त्यानंतर मंगळवारी (ता. ६) पाच लाखांच्या रोकडीसह सानपाडा रेल्वे स्थानकबाहेरील खाऊ गल्ली येथे बोलावले. खान हे त्यांच्या मित्रासह कारने सानपाडा येथे पोहोचले असता तेथे किशनलाल आला.
फिल्मी स्टाइलने केली लूट
सानपाडा स्थानकाबाहेर एका कारमधून काही व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी किशनलाल हा गुन्हेगार असल्याचे भासवत त्याला पकडण्याचे नाटक केले व त्याला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात आरोपींनी रियाज खान यांच्यावर काठीने हल्ला केला आणि किशनलालने खान यांच्या हातातील पाच लाखांची रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेतली. त्यानंतर सर्व आरोपी कारमधून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रियाज खान यांनी तत्काळ सानपाडा पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांच्या तपासात किशनलाल हा सुखविंदर जसबीर सिंगधाम या नावानेही ओळखला जात असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.