पनवेलच्या बाजारपेठेत वाहतूकबंदी!
९ ते ११ आणि १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान प्रमुख मार्ग बंद
पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या (दसरा) पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील गर्दीच्या प्रमुख मार्गांवर विशिष्ट कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली असून, पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांनी विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत तसेच १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कर्नाळा भाजी मार्केट, कर्नाळा भाजी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊराव पाटील चौक ते कर्नाळा भाजी मार्केट सर्कल या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा बंद राहणार आहे. तसेच, उरण नाका ते टपाल नाका मार्गे कर्नाळा भाजी मार्केट सर्कलकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कर्नाळा भाजी मार्केट परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांनी पंचरत्न चौक मार्गाचा वापर करावा. उरण नाक्याकडून येणाऱ्या वाहनांनी पंचरत्न चौक किंवा विश्राळी नाका मार्गे इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. पोलिस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी गुजराती शाळेचे पटांगण, सरस्वती विद्यालयाचे नाट्यगृहासमोरील पार्किंग आणि वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.