एपीएमसी मार्केटमध्ये मोबाईल चोरांचा धुमाकूळ!
चोरट्यांनी तीन महागडे फोन हिसकावले; व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : वाशी येथील एपीएमसी मार्केट परिसरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांनी एकाच रात्री, अवघ्या सव्वा तासाच्या अंतरात तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे महागडे मोबाईल फोन हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. जलाराम मार्केट, मसाला मार्केट आणि ट्रक टर्मिनल परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे फोन लांबवले आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
बुधवारी (ता. १४) मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मोबाईल लुटीच्या तीन घटना घडल्या. पहिली घटना रात्री १२.४५ च्या सुमारास सेक्टर १९ मधील जलाराम मार्केट परिसरात घडली. प्रथमेश बावर (२५) हा गिफ्ट कॉर्नर दुकानासमोरील रस्त्यावर मोबाईलवर बोलत उभा असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी प्रथमेशच्या हातातील ७१ हजार रुपये मोबाईल हिसकावून पळ काढला.
त्यानंतर या लुटारूंनी रात्री १.१५च्या सुमारास मसाला मार्केटच्या गेट क्रमांक चारसमोर परसराम कुरुंद (२७) हा मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी त्याला लक्ष्य करत त्याच्या हातातील ७५ हजार रुपयांचा फोन हिसकावून पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळील ट्रक टर्मिनल परिसरात संतोष गोस्वामी (२६) याचा १६ हजार रुपये किमतीचा मोबाईलही लंपास केला. तिन्ही घटनांतील आरोपींचे वर्णन जवळपास सारखे असल्याने या लुटीमागे एकाच टोळीचा हात असल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात लुटारू विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.