मुंबईतील रेशनिंगच्या धान्याची कर्नाटकात तस्करी
अंधेरीतील गोदामापासून म्हैसूरपर्यंत काळाबाजार; ट्रकसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ट्रकचालक अटकेत
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : गरिबांना सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याची परराज्यात तस्करी करण्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. मुंबईतील अंधेरी येथून कर्नाटकातील म्हैसूर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा ३० हजार ५०० किलो गहू व मिश्रित धान्याचा साठा गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने बेलापूर येथे पकडला. यामध्ये धान्यासह एकूण २८ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ट्रकचालकाला अटक केली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (ता. ३०) रात्री सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला होता. या वेळी गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक पासिंगच्या १४ चाकी ट्रकला अडवून तपासणी केली असता, यामध्ये गहू आणि गहू-तांदूळमिश्रित आढळले. या धान्याच्या एकूण ६१० गोणी असून, त्याचे वजन ३० हजार ५०० किलो आहे. त्याची किंमत नऊ लाख ५९ हजार २२५ रुपये असल्याचे समोर आले. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गोदाम मालक प्रवीण गेला गामी, व्यवस्थापक सबी अहमद वकील अहमद खान, ट्रकचालक मंजूनाथ मघेन्नावर तसेच विनायक फ्लोर मिलचे मालक आणि अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक मंजूनाथ मघेन्नावर याला अटक करण्यात आली आहे.
अंधेरीतील गोदामावर छापा
पोलिसांनी ट्रकचालकाकडे असलेल्या टॅक्स इन्व्हाइसची तपासणी केली असता, त्यात केवळ गव्हाचा उल्लेख होता. प्रत्यक्षात ट्रकमध्ये तांदूळमिश्रित धान्यही आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाची अधिक चौकशी केली असता, हा माल अंधेरीतील साकीनाका परिसरातील केबीएम कम्पाउंड, मारवा रोड येथील उमया स्टोअरमधून भरल्याचे स्पष्ट झाले. गोदाम मालक प्रवीण गामी याच्या सांगण्यावरून हा माल कर्नाटकातील म्हैसूर येथील विनायक फ्लोर मिलमध्ये जादा दराने विक्रीसाठी नेला जात असल्याचे उघडकीस आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंधेरीतील संबंधित गोदामावर छापा टाकला असता, त्या ठिकाणी रेशनिंगच्या धान्याच्या आणखी २४४ गोणी आढळून आल्या. त्यामध्ये गहू, तांदूळ आणि मिश्रित धान्याचा समावेश असून, त्याची किंमत तीन लाख ५० हजार २०० रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.