घरात घुसून दोन बहिणींवर गोळीबार
कोपरखैरणेतील घटना; संशयित पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : कोपरखैरणे सेक्टर १ येथे गुरुवारी (ता. ५) घरात घुसून एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींवर पिस्तुलातून गोळीबार केला. रात्री ९च्या सुमारास घडलेल्या या घटनेत तन्नू धोबी (वय २०) हिच्या पाठीत गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली, तर रितू धोबीच्या (२२) कानाला गोळी चाटून गेल्याने ती थोडक्यात बचावली. या गोळीबारानंतर फरार झालेल्या अर्जुन चौहानला कोपरखैरणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धोबी कुटुंबीय कोपरखैरणे सेक्टर १ मध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री नितीन प्रदीप धोबी आणि त्याचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या वेळी घरात दोन्ही बहिणी आणि त्यांची आई होती. अर्जुन चौहान हा तरुण अचानक त्यांच्या घरात घुसला. त्याने दोन्ही बहिणींना लक्ष्य करून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. यात तन्नूच्या पाठीत गोळी लागली, तर रितूच्या कानाला गोळीचा स्पर्श झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना त्यांच्या आईने रुग्णालयात दाखल केले. तन्नूवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रितूवरही उपचार करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारामागे प्रेमप्रकरणाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संशयित अर्जुन चौहानला ताब्यात घेतले आहे. गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल, हल्ल्यामागील कारण आणि अन्य काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.