फायनान्स कंपनीला ८.९२ कोटींचा गंडा
कंपनीच्या कर्जवाटप प्रणालीतील सुरक्षा यंत्रणेला भेदून लूट
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : सायबर भामट्यांनी नवी मुंबईतील मिराई अॅसेट फायनान्स सर्व्हिसेस कंपनीच्या कर्जवाटप प्रणालीतील सुरक्षा यंत्रणेला भेदून चार तासांत आठ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपयांची ऑनलाइन लूट केली. या टोळीने बोगस कर्ज खाती तयार करून कंपनीच्या स्वयंचलित कर्जवाटप प्रणालीचा गैरवापर करून ४३८ वेळा अनधिकृत कर्जवाटप करून ही लूट केली आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या घोटाळ्याप्रकरणी अनोळखी टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या चार तासांच्या कालावधीत हा प्रकार घडला. मिराई अॅसेट फायनान्स सर्व्हिसेस डिजिटल माध्यमातून ग्राहकांना कर्जपुरवठा करते. यासाठी कंपनीने ‘किश्त’सह विविध व्यावसायिक भागीदारांशी एपीआय प्रणालीद्वारे जोडणी केली आहे. ग्राहकांच्या कर्जाची पडताळणी जोकटा आणि फिनोनेनीओ या प्रणालींच्या माध्यमातून करण्यात आली असून, वितरणाची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने केली जाते. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन मिनिटांत कर्ज मंजुरी आणि वितरण होण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.
सायबर भामट्यांनी याच प्रणालीतील तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत कंपनीच्या लोन ओरिजिनेशन सिस्टीमची सुरक्षा यंत्रणा बायपास केली. तसेच ‘किश्त’या व्यावसायिक भागीदाराचा प्लॅनमॅक्स हा प्रॉडक्ट कोड वापरून ५८३ बोगस कर्ज खाती तयार केली. त्यानंतर १४३ हून अधिक रिक्वेस्टचा गैरवापर करून, तसेच ४३८ वेळा अनधिकृत कर्जवाटप करून कंपनीच्या खात्यातून आठ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळती केली. दुपारी ३ वाजता कंपनीच्या बॅकएंड टीमला कर्जवाटप अयशस्वी झाल्याबाबतचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर कंपनीचे ऑपरेशन्स हेड राहुल राज आणि कंपनी सेक्रेटरी गोविंद लालवानी यांनी कंपनीच्या व्यवहारांची तपासणी केली. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. कंपनीने तातडीने राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली. तसेच बँकेशी संपर्क साधून संबंधित खाते गोठविण्याची कारवाई केली.