सणासुदीच्या काळात दुचाकीस्वार लुटारूंचा धुमाकूळ
सहा दिवसांत सहा ठिकाणी मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांची लूट
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : दिवाळीच्या काळात नवी मुंबईसह पनवेल परिसरात दुचाकीस्वार लुटारूंच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जाणारे नागरिक आणि महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लक्ष्य करून अवघ्या काही सेकंदांत ऐवज लुटून पसार होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. १ ते ६ नोव्हेंबरदरम्यान वाशी, सीवूड्स, खारघर, पनवेल आणि कामोठे परिसरात अशा तब्बल सहा घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहुतांश घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी रस्त्यावरील नागरिकांचे महागडे मोबाईल, सोन्याची चेन आणि गंठण असा लाखोंचा ऐवज लांबवला आहे. त्यामुळे या घटनांमागे एकाच सराईत टोळीचा हात आहे की वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय आहेत, यादृष्टीने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ
वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ ४ नोव्हेंबरला मोबाईलवर बोलत चाललेल्या व्यक्तीच्या हातातील एक लाख ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावून नेला. त्याच दिवशी सीवूड्स सेक्टर ४२ मधील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एनएमएमटी बस थांब्याजवळून पायी जाणाऱ्या व्यक्तीचा एक लाख ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटून नेला आहे. खारघरमध्ये ३ नोव्हेंबरला ओवेगाव पोलिस चौकीजवळील गुप्ता क्लिनिक परिसरात एका व्यक्तीला विनाकारण शिवीगाळ करून त्याच्या खिशातील एक लाख ५० हजार रुपये किमतीचा फोन आणि सोन्या-चांदीचा ऐवज लुटण्यात आला. पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ नोव्हेंबरला पळस्पे ते जेएनपीए महामार्गावरील करंजाडे फाट्याजवळ तीन जणांनी एका व्यक्तीचा ५९ हजार ९९९ रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला, तर लुटारूंनी मोबाईलमधील फोन-पे ॲपचा वापर करून पाच हजार रुपयेही परस्पर काढून घेतले आहेत.
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लक्ष्य
वाशी सेक्टर १७ मधील ओंकार सोसायटीबाहेरील पदपथावर ६ नोव्हेंबरला मोबाईलवर बोलत चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चेन दुचाकीस्वारांनी हिसकावून नेली. याच दिवशी खांदा कॉलनी परिसरात किया शोरुमजवळ पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल सहा लाख ५० हजार रुपये किमतीचे ५० आणि १५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गंठण हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. या घटनेतील दागिन्यांची किंमत पाहता लुटारूंचे धाडस वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम
सणासुदीच्या काळात बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढते. मोबाईलवर बोलण्यात किंवा खरेदीत गुंतलेल्या नागरिकांना लक्ष्य करून लुटारू संधी साधत आहेत. दुचाकीवरून वेगाने पसार होणे ही या गुह्यांमधील समान पद्धत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनीही रस्त्यावरून चालताना मोबाईलचा वापर टाळावा, महागडे दागिने उघड्यावर घालणे टाळावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.