भावली धरणाचे पाणी ठाणेकरांना मिळणार
जलसंपत्ती प्राधिकरणाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक ता. २९ : भावली धरणाचे पाणी अखेर ठाणेकरांना मिळणार असून, याबाबतचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. शहापूरमधील ९७ गावांना इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे; मात्र आता प्राधिकरणाने यावर कुठलीही तारीख घ्यायची, असेही निकालात सांगितले आहे. आमच्या हक्काचे पाणी सोडू नये म्हणून इगतपुरी तालुक्यातून वारंवार या निर्णयासाठी विरोध झालेला आहे. या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत असून, त्यामुळे आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इगतपुरी तालुक्यात भावली दारणा नदीच्या उगमस्थानी असलेले भावली धरण हे ५०० मीटरहून अधिक उंचीवर आहे. गुरुत्वाकर्षण नियमानुसार पाणी शहापूरला सहज मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता. शहापूर तालुक्यातील ९७ गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठा आवश्यक आहे. पाणीपुरवठ्यासाठी १२.६९ दशलक्ष घनमीटर इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाला आरक्षित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१८ला झाला हाेता. यासंदर्भात यासाठीची निविदा प्रस्ताव प्रसिद्ध होऊन कामही पूर्ण झालेले आहे.
शहापूरला पाणी हवे असेल तर मोडक सागर, मध्य वैतरणा व भातसा या धरणांतून पाणी मिळू शकते. ३,००० घनमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल तर तो भाग दुष्काळी म्हणून गणला जातो. वैजापूर, गंगापूर हे दुष्काळी तालुके आहेत, यासाठी या चार धरणांची निर्मिती केली आहे.
.............
पाणी सोडण्यास अजून काही कालावधी
जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडून यासंदर्भातील काम उभारले जाणार आहे. त्यामुळे यामधील अनेक बाबींसाठी काही कालावधी जाणार आहे. यंत्रणा पूर्ण उभारली गेल्यानंतर प्राधिकरणकडून नाशिक जलसंपदा विभागाला कळविले जाईल. त्यानंतर पाणी सोडण्यात येईल.
.................
कमी पावसाच्या परिभागातून जास्त पावसाच्या ठिकाणी पाणी देऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. या निकालावरून असे लक्षात येते, की शासनाविरुद्ध शासनच निर्णय घेत आहे. यासंदर्भात पुढील कायदेशीर लढ्याचा विचार सुरू आहे.
- डॉ. शंकरराव नागरे, याचिकाकर्ते तथा माजी तांत्रिक सदस्य, वैधानिक विकास मंडळ
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.