शेअर बाजारात व्हॉट्सॲपवरून ‘पम्प अँड डम्प’ फ्रॉड
ईडीचे नाशिकसह सहा शहरांत छापे; २०० कोटींची खाती गोठवली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : शेअर बाजारात व्हॉट्सॲप ग्रुप्सचा गैरवापर करून ‘पम्प अँड डम्प’ योजनेद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने नाशिकसह मुंबई, अहमदाबाद, गांधीनगर, सूरत आणि भावनगर या सहा शहरांतील तब्बल २९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत सुमारे २०० कोटी रुपयांचे ट्रेडिंग अकाउंट्स गोठविण्यात आले असून, अनेक संशयास्पद कागदपत्रे व डिजिटल साधने जप्त करण्यात आली आहेत.
ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आर. एम. ड्रिप अँड स्प्रिंकलर्स सिस्टीम्स लि. आणि आर अँड बी डेनिम्स लि. या दोन सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान ईडीने कंपन्यांची कार्यालये, प्रवर्तकांची निवासस्थाने, शेअर ब्रोकिंग आणि फायनान्स कंपन्यांची कार्यालये तसेच व्हॉट्सॲपवरून खोट्या टिप्स पसरवणाऱ्या संशयितांच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान या कंपन्यांनी ३.५ कोटींहून अधिक शेअर्स आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्स अत्यंत कमी दरात ठरावीक लोकांना व संस्थांना दिले. यासाठी लागणारा बहुतांश पैसाही याच नेटवर्कमधील घटकांनी पुरवला होता. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ यांसारख्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरून किरकोळ गुंतवणूकदारांना हे शेअर्स खरेदीचे मेसेज पाठवले गेले. हे ग्रुप्स हरियाणा आणि मुंबईतील व्यक्तींच्या नावे घेतलेल्या सिम कार्डवर चालवले जात होते, तर त्यांचे संचालन गुजरातच्या भावनगरमधून होत होते.
व्हॉट्सॲप, एक्स आणि एसएमएसद्वारे जाहिरातबाजी करून शेअर्सचे भाव कृत्रिमरीत्या प्रचंड वाढवण्यात आले. भाव वाढताच सुरुवातीला स्वस्तात शेअर्स मिळवलेल्या प्रवर्तक व मध्यस्थांनी स्वतःकडील शेअर्स चढ्या दराने विक्री करून लाखो रुपयांचा नफा कमावला आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
तपासात काय आढळले?
ईडीच्या तपासात ‘ॲफ्लुएन्स जेम्स,’ ‘कावा एचयूएफ’ आणि ‘कोमले कन्सलटन्सी’ यांसारख्या कौटुंबिक संबंध असलेल्या लाभार्थी संस्थांची नावे समोर आली आहेत. छापेमारीदरम्यान विविध आक्षेपार्ह दस्तऐवज, डिजिटल उपकरणे, शेअर्सच्या व्यवहारांची नोंद पुस्तके आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.