वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा विचार करावा
आदित्य बिर्ला सन लाइफ सीआयओ महेश पाटील यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ : शेअर बाजारातील सद्यःस्थितीत घसरण पाहता, आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत वैविध्य ठेवायला हवे. बाजारातील घसरण ही आकर्षक मूल्यांकनांवर मालमत्ता जमा करण्याची संधी निर्माण करते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून भांडवल गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे (एएमसी) मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) महेश पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
सध्या बाजारात अस्थिरता असूनही भारताची दीर्घकालीन आर्थिक परिस्थिती मजबूत आहे आणि बाजारातील बहुतांश ‘करेक्शन’ पूर्ण झाले आहे. अल्पकालीन जोखीम कायम असली तरी सुधारत चाललेले व्यापक आर्थिक क्षेत्र आणि धोरणात्मक उपायांमुळे टप्प्याटप्प्याने भांडवल गुंतवण्याची संधी निर्माण झाली आहे, असे सांगून ते म्हणाले की मूल्यांकनाचा स्तर तुलनेने अनुकूल असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी लार्ज-कॅप आणि फ्लेक्सी-कॅप इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. लार्ज-कॅप इक्विटीसोबत मल्टी-अॅसेट आणि बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडांचा समावेश गुंतवणुकीत करणे फायद्याचे ठरेल. बँकिंग, वित्तीय सेवा, डिजिटल व्यवसाय आणि ग्राहककेंद्रित उद्योग ही प्राधान्य क्षेत्रे आहेत. निश्चित उत्पन्न गटामध्ये यंदा ८-९ टक्के परतावा अपेक्षित असल्याने सावधगिरी बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक पर्याय ठरू शकतो. सोने-चांदीत ८-१२ टक्के परताव्याची शक्यता असल्याने जागतिक अनिश्चिततेपासून संरक्षण (हेज) म्हणून या गुंतवणुकीला महत्त्व द्यायला आहे.
निवडणुकीनंतरच्या तेजीतील अतिरिक्त वाढ कमी झाल्यानंतर बाजारात लक्षणीय ‘करेक्शन’ दिसून आले आहे. स्मॉल आणि मिड-कॅप शेअरमध्ये तीव्र घसरण झाली आहे. ‘एनएसई ५००’पैकी जवळपास निम्म्या शेअरनी त्यांच्या उच्चांकावरून ३० टक्के किंवा त्याहून अधिक घसरण अनुभवली आहे. हे पुनर्संतुलनाच्या टप्प्याचे संकेत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी दर्शवतात, असे सांगून पाटील म्हणाले की बाजार संक्रमणाच्या टप्प्यावर असून, निवडक आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मूलभूत घटक, तांत्रिक प्रवाह आणि तरलता यांच्या आधारावर सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण केल्यास एक स्पष्ट चित्र समोर येते आणि ते म्हणजे गुंतवणुकीसाठी सावध पण आशावादी दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.
...
शेअर बाजाराला अनुकूल पार्श्वभूमी
केंद्रीय अर्थसंकल्प हा वित्तीयदृष्ट्या सावध असला तरीही वैयक्तिक प्राप्तिकर सवलतींमुळे खर्चाला (कन्झम्शन) चालना मिळणार आहे. या बदलामुळे मध्यमवर्गीयांच्या खर्चाला गती मिळेल आणि ग्राहकोपयोगी आणि ऐच्छिक वस्तू यांसारख्या क्षेत्रांना लाभ होईल. जोडीला वाढीव उत्पन्नामुळे नवे कर्जवाटप वाढेल आणि ठेवींच्या वाढीस चालना मिळेल. त्याचा फायदा खासगी बँका आणि वित्त पुरवठादारांना होईल. तसेच रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या पाव टक्का व्याजदरकपातीने वाढीला बळ देण्याचा संकेत दिला आहे. २०२५मध्ये आणखी दरकपात अपेक्षित असल्याने तरलता सुधारेल आणि त्यामुळे शेअर बाजाराला अनुकूल पार्श्वभूमी मिळेल, असेही पाटील यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.