रेवदंडा ग्रामसभेत नागरिक आक्रमक
खाडीपुलासाठी जागा देण्यास हरकत; पाणी, रस्ते आणि पथदिव्यांच्या प्रश्नांवरही चर्चा
रेवदंडा, ता. १ : येथील ग्रामपंचायतीची ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा सोमवारी (ता. ३१) सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील इतिवृत्त मंजुरीवेळी रेवस-रेड्डी मार्गावरील कुंडलिका खाडीवरील प्रस्तावित पुलाचा मुद्दा चर्चेत आला. पुलासाठी नागरिकांच्या जागा जाणार असून त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, अलिबागमार्फत मोबदला मिळणार आहे; मात्र जागा देण्याच्या ठरावाला नागरिकांनी विरोध केला. पुलासाठी ग्रामपंचायतीची डम्पिंग ग्राउंडची जागाही जाणार असल्याने पर्यायी जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पर्यायी जागा मिळाल्यानंतर व बाधित नागरिकांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतरच ठराव पाठवावा, अशी मागणी संदीप खोत यांनी केली.
थेरोंडा भागात उन्हाळ्यात तीन महिने पाणीटंचाईनंतर पावसाळ्यातही उमटे धरणातून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली. वरसोलपाड्यातील किनारी भागातील बंद पथदिव्यांमुळे पर्यटक व कोळी बांधवांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन सरपंचांनी दिले. थेरोंडा मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व रुग्णांची गैरसोय होत असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी झाली. उपसरपंच संतोष मोरे यांनी आश्वासन दिले.
अतिक्रमणातील निवासी जागा नियमित करण्याबाबत ग्रामविकास अधिकारी तथा सचिव सुदेश राऊत यांनी माहिती दिली. सामुदायिक कृषी संस्थेच्या अतिरिक्त जागेची मोजणी करून जादा जागा गरजूंना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामसभेला सदस्य, नागरिक, अंगणवाडी सेविका, शासकीय व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
अंगणवाडीतील मुलांना धोका
मोठे बंदर भागात नव्याने रो-रो सेवेची जेट्टी उभारण्यात येत असून, या ठिकाणी जाणारा मार्ग सध्या चिखलमय झाला आहे. याच मार्गावर अंगणवाडी असल्याने लहान मुलांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच डम्पर व अन्य वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. खाडीकिनारी उभारण्यात येणाऱ्या मत्स्य अवतरण केंद्राच्या कामामुळे ध्वनी व वायुप्रदूषण होणार नाही, तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित प्रकल्पाला आवश्यक अटी घालाव्यात, अशी लेखी मागणीही करण्यात आली.
--------------------------------
कुंडलिका पूलबाधित नागरिकांचा जागा देण्यास विरोध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.