सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या काळात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी शहरातील प्रमुख चौक, तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांमार्फत सुरू करण्यात येत आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतरही काही ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याची बाब खुद्द उपमहापौर राहुल दामले यांनी उघडकीस आणली आहे.
डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर परिसरातील पारसमणी चौकातून जात असताना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेला खडीचा भराव दामले यांच्या निदर्शनास आला. या कामाची पाहणी केल्यानंतर खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकण्यात आली असून डांबराचा वापर नीटसा झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी शहर अभियंता यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कामासाठी वापरण्यात आलेल्या खडीच्या भरावाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून काम नियमानुसार झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. तसेच तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे बिल काढू नये, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.