शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरण
रजिस्टर जप्तीच्या पंचाची साक्ष
२१ सप्टेंबरला आरोपीच्या जामिनावर सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला आहे. घटनेनंतर हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आलेल्या रजिस्टरच्या पंचनाम्यावेळी उपस्थित असलेल्या शासकीय पंचाची शनिवारी कल्याण सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगेकर यांनी बाजू मांडली. पुढील साक्षीदाराची साक्ष २३ सप्टेंबरला नोंदविण्यात येणार आहे.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. या वेळी विक्रीकर निरीक्षक असलेल्या शासकीय पंचाने रजिस्टर जप्तीची प्रक्रिया न्यायालयासमोर सांगितली. पोलिसांनी जप्त केलेले रजिस्टर आपण ओळखले असून, ते जप्त करताना आपण पंच म्हणून उपस्थित होतो, असे साक्षीदाराने सांगितले. तपासानुसार याच रजिस्टरचा वापर डॉक्टर वैभव यांना मारहाण करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे, अशी माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली.
दरम्यान, या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन कामकाजात सहभागी झाली. तिच्या जामीन अर्जावर २१ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
२३ सप्टेंबरला पुढील साक्ष
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने सुरू आहे. २३ सप्टेंबरला पुढील साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय कारंडे आणि साधना कारंडे असे पाच आरोपी आहेत. त्यामुळे २१ सप्टेंबरची जामीन अर्जावरील सुनावणी आणि २३ सप्टेंबरला होणाऱ्या पुढील साक्षीकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.