मासेमारीचे सातपाटी केंद्र
बंदर उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ३० ः जिल्ह्यात सातपाटी येथे तरंगते बंदर उभारले जाणार आहे. यासाठी केंद्राने मान्यता दिली असून प्रस्तावित बंदर उभारणीला गती मिळावी म्हणून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे भविष्यात सातपाटी राज्यातील आधुनिक मासेमारी केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
सातपाटीतील अस्तित्वात असलेल्या बंदरातील पायाभूत सुविधा मर्यादित आहेत. नौकानयन मार्गातील गाळामुळे बोटी थांबवणे, मासे उतरवण्याच्या विविध समस्या कोळीबांधवांसमोर आहेत. येथे आधुनिक बंदर उभारणीची मागणी सातत्याने होत असल्याने महाराष्ट्र सागरी मंडळाने बंदर उभारणीचा सविस्तर आराखडा तयार केला होता. या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी मे मध्ये भूमिपूजन केले होते. तर बंदराच्या सुविधांचे नियोजन, अभिकल्प (डिझाइन), अंदाजपत्रक, व्यवहार्यता तपासणे, क्षेत्रीय पाहणी तसेच अंमलबजावणीसाठी आता सल्लागार नेमला जात आहे.
-------------------------
बंदराची वैशिष्ट्ये
- संरक्षण भिंती
- क्वे-वॉल
- २.५ मीटरपर्यंत गाळ उपसा
- नौकानयन मार्ग
- मासे उतरवण्यासाठी धक्का
- अपेक्षित खर्च : २४१ कोटी २७ लाख
-------------------------
जल क्षेत्रातील सुविधा
- दगडी बांधकामाचा लाटा-रोधक धक्का, बंदराच्या पात्रातील गाळ काढणे, बहुउद्देशीय धक्के, उतार असलेली पक्की जागा, बोटींसाठी किनाऱ्यावर उतरण्याची सोय, किनारा संरक्षण भिंत, नौकानयन सहाय्यक सुविधा.
----------------------
जमिनीवरील सुविधा
- मासे लिलाव गृहे, जाळी दुरुस्ती शेड, बोट दुरुस्ती आवार, मासेमारी साधने ठेवण्याची शेड, मत्स्य-व्यवसाय प्रशासकीय इमारत, वाहन पार्किंग, दुरुस्तीचे वर्कशॉप, उपहारगृह, विश्रांतीगृह, सार्वजनिक स्वच्छतागृह संकुल. - शुद्ध पाणी पुरवठा आणि वितरण व्यवस्था, अंतर्गत रस्ते, सांडपाणी निचरा, मलनिस्सारण व्यवस्था, संरक्षक भिंत, रेडिओ संपर्क केंद्र, नागरी सुविधा, उद्याने/पार्क, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, विद्युत उपकेंद्र, इंधन केंद्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.