विरार, ता. ६ (बातमीदार) : नालासोपाऱ्याच्या प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख देण्याच्या दिशेने वसई-विरार महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. नालासोपारा शहराचे नाव बदलून ‘शूर्पारक नगरी’ करण्यात यावे, अशी मागणी महासभेत करण्यात आली. यावर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक भूमिका मांडत केवळ नालासोपाराच नव्हे, तर संपूर्ण वसई-विरार महापालिकेचे नाव ‘शूर्पारक’ करण्याच्या प्रस्तावाबाबतही कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचे स्पष्ट केले.
वसई-विरार महापालिकेच्या महासभेत शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासह विविध स्मारकांच्या उभारणीवर चर्चा झाली. या वेळी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी नालासोपाऱ्याचे नाव ‘शूर्पारक नगरी’ करण्याची मागणी केली. प्राचीन काळात शूर्पारक हे कोकणातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध होते. या परिसराला हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, नालासोपारा येथे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज नालासोपाऱ्याची ओळख प्रामुख्याने मुंबईचे उपनगर अशी आहे, मात्र देशभरातून प्राचीन ‘शूर्पारक’चा शोध घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना अपेक्षित माहिती व वारसा स्थळे ठळकपणे दिसून येत नाहीत, अशी खंत मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि शहराची प्राचीन ओळख पुनर्स्थापित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे महापौरांनी सांगितले.
राज्याचे तत्कालीन सचिव गायकवाड असताना या विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा वसई-विरार महापालिकेचे नाव ही ‘शूर्पारक’ करावे, हा विचार पुढे आला होता. त्यादृष्टीने सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पडताळून पाहिल्या जात आहेत.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.