विरार, ता. ४ (बातमीदार) : इतिहास म्हणजे केवळ युद्धे, राजांचे पराक्रम, सनावळ्या आणि तारखांचा दस्तऐवज नसून तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंबही आहे. याच दृष्टिकोनातून वसईतील इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी इसवी सन १७४०-१७४१ दरम्यानच्या पेशवेकालीन उत्तर कोकणातील गुन्हेगारीचा संशोधनपर अभ्यास केला आहे.
वसई, माहीम आणि परिसरातील विविध गावांमध्ये घडलेल्या जवळपास ३७ गुन्हेगारी घटनांचा या अभ्यासातून मागोवा घेण्यात आला आहे. विविध जाती-जमातींतील गुन्हे, बदअमल, व्यभिचार, अंधश्रद्धा, सरकारी बटीक, चुकीच्या वस्तूंची विक्री, गळफास, चोरी, कर्जविषयक प्रकरणे, चौकशी, दगडाने मारहाण, गंभीर दुखापत, गर्भधारणा तसेच आज्ञापत्र-विनंती अशा विविध विषयांवरील नोंदी यात समोर येणार आहेत.
आलेवाडी तर्फ तारापूर, बाजीपुरा, आगर वसई, मुळगाव, भुईगाव, तारापूर, सोपारा, उंबराळे, बोळिंज, आगाशी, कामण, चिंचणी, माहीम आदी परिसरातील घटनांचा यात समावेश आहे. इसवी सन १७४१च्या सुमारास वसई प्रांतातून गुन्हेगारीच्या माध्यमातून सुमारे १,७७५ रुपयांची रक्कम जमा झाल्याचेही संशोधनातून पुढे येते.
या मोडी कागदपत्रांच्या अभ्यासात स्त्रीविषयक नोंदी संकलित करण्यासाठी कल्पना राऊत यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. या संशोधनातून तत्कालीन न्यायव्यवस्था, सामाजिक श्रद्धा-अंधश्रद्धा आणि सरकारी अर्थकारणावरही प्रकाश पडणार आहे. ऑक्टोबरमध्ये पालघर जिल्ह्यातील विविध गडकोटांवर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.
मोडी कागदपत्रांच्या संशोधनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास एका नव्या विषयाची संशोधन चिकित्सा पुढे आणणार आहे. पालघर जिल्ह्यातील १८व्या शतकातील गुन्हेगारी प्रसंगावर संशोधनपर लेखी तपशील पुराव्यानिशी मांडता येणार आहे, याचा आनंद आहे.
- श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक
विविध कालखंडातील स्त्रीविषयक संकलन तपशील संशोधन करून येणाऱ्या पिढीला संशोधन वारसा सुपूर्द करणे, हेच प्रमुख ध्येय आहे. १८व्या शतकातील स्त्रियांची सामाजिक स्थिती अभ्यासण्यासाठी लिखित संदर्भ महत्त्वाचे आहेत.
- कल्पना राऊत, अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.