श्रमजीवी संघटनेत महिला नेतृत्वाला बळ
कर्तृत्वाच्या आधारे सहा महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
विरार, ता. ९ (बातमीदार) : श्रमजीवी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीत महिलांना नेतृत्वाची अधिक व्यापक संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहा महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संघटनेसाठी दीर्घकाळ केलेले कार्य, योगदान आणि नेतृत्वक्षमता या निकषांवर या महिलांची निवड करण्यात आली आहे.
श्रमजीवी संघटनेत ६० ते ७० टक्के महिला कार्यरत असून, महिला शक्ती हीच संघटनेची खरी ताकद असल्याचे संस्थापक तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी सांगितले. घरगुती जबाबदाऱ्या, सामाजिक बंधने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महिलांनी संघटनेसाठी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत बोलताना विवेक पंडित यांनी संविधानातील समानतेच्या तत्त्वाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे.
समानता हाच संविधानाचा खरा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड कोणत्याही वशिलेबाजीने नव्हे, तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आधारे करण्यात आली आहे. यासाठी तीन ते चार महिने निवडप्रक्रिया राबविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रेखा पऱ्हाड यांची महिला प्रमुख, दमयंती निंबारे यांची महिला सचिव, जयंती परेड यांची पालघर जिल्हा महिला प्रमुख, संजीवनी सुरुंदा यांची पालघर उपजिल्हा महिला प्रमुख, रेणुका पागी यांची पालघर जिल्हा महिला सचिव, तर प्रतीक्षा सांबरे यांची ठाणे जिल्हा महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून गरीब आणि वंचितांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. राज्यापासून तालुका स्तरापर्यंतचे पदाधिकारी तसेच श्रमजीवी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. महिला आणि विद्यार्थी आघाडीला सोबत घेऊन संघटनेचा विस्तार अधिक गतिमान करण्यात येईल, असा विश्वास संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.