पालघर, ता. १२ : देशभरात डिजिटल इंडिया अभियानाचा गाजावाजा सुरू असताना पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ४७४ पैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये अद्याप सार्वजनिक इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे. ही आकडेवारी सरकारी असली तरी जिल्ह्यात शेकडो ग्रामपंचायतीत जोडणी असली, तरी इंटरनेट नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे डिजिटल कारभाराच्या घोषणा आणि ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती यातील तफावत स्पष्ट झाली आहे.
डिजिटल इंडिया सार्वजनिक इंटरनेट सेवा कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पालघर जिल्ह्यातील ४४३ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधेची सामग्री लावलेली आहे, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे ३१ ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट पोहोचलेले नाही. विशेष म्हणजे, मोखाडा तालुक्यात सर्वाधिक १६ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्याखालोखाल वाडा तालुक्यातील सात, जव्हारमधील सहा आणि विक्रमगडमधील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
इंटरनेटअभावी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार प्रभावित होत आहे. विविध शासकीय योजनांचे अर्ज, दाखले, जन्म-मृत्यू नोंदणी, घरपट्टी वसुली, ऑनलाइन अहवाल, प्रशासकीय पत्रव्यवहार आणि सरकारच्या पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे, मात्र इंटरनेट सुविधा नसलेल्या ग्रामपंचायतींमधील कर्मचारी पर्यायी व्यवस्था शोधताना दिसतात. अनेकदा कामांसाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याने नागरिकांचाही वेळ आणि पैसा खर्च होत आहे.
एकीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले जात असताना दुसरीकडे ग्रामपंचायतींनाच इंटरनेटसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे उर्वरित ३१ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोखाडा पीछाडीवर
मोखाडा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ११ ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, तर १६ ग्रामपंचायतींना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील ८४ पैकी ७७, जव्हारमधील ५० पैकी ४४ आणि विक्रमगडमधील ४३ पैकी ४१ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
खासदारासमोर कैफियत
डिजिटल सुविधांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यापूर्वी ग्रामपंचायतींचे इंटरनेट जाळे सक्षम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ग्रामपंचायतींसाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे, अशी कैफियत एका बैठकीत ग्रामपंचायत विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासमोर मांडली होती.
पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायती इंटरनेटविना असणे, ही बाब चिंताजनक आहे. याबाबत दूरसंचार विभागाची स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश दिले आहेत.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार
आकडेवारीतून डिजिटल वास्तव
एकूण ग्रामपंचायती ४७४
इंटरनेट सुविधा ४४३
इंटरनेटविना ग्रामपंचायती ३१
इंटरनेट सुविधेपासून वंचित १०० पेक्षा जास्त
इंटरनेटविना ग्रामपंचायती
तालुका संख्या
मोखाडा १६
वाडा ७
जव्हार ६
विक्रमगड २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.