अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : विवाह संस्कार हा सोळा संस्काररापैकी एक महत्वाचा संस्कार. विवाह संबंधित वेगवेगळ्या भागात विविध अशा चालीरिती आजही जोपासल्या जातात. मंडप, वरात, बांगड्या भरणे, मेहंदी काढणे आदी कामांसाठी धावपळ विवाह सोहळा जवळ आला की सुरु होते. आजही ग्रामीण भागात लग्नात बोहले घालण्याची प्रथा सुरु असली तरी शहरी भागात बोहले घालने जागे अभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
ग्रामीण भागात पूर्वी पाच- पाच दिवस लग्नविधी चालायचे असं जुनेजानते मंडळी सांगतात. परंतू सध्या धावपळीच्या काळात पाच दिवसाचे लग्न अडीच दिवसावर आणि काही तर दीडदिवसात देखील आटोपले जातात. लग्न विधीच्या प्रथम दिवशी हरिद्रालेपन अर्थात हळद लावणे, गादी भरणे हे विधी आटोपले जातात. त्यानंतर हळदीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष लग्नाच्या एक दिवस अगोदर देवकार्य आटोपले जाते. त्यालाच जमाव असे म्हणतात.
हळदीच्या दिवशी भावकीतील मंडळी तसेच गावकऱ्यांना बोलावून वधू आणि वरांच्या घरी हळदीचा मांडव घातला जातो. आता या मांडवातही काळानुसार डामडौल आला आहे. सधन कुटुंबातील व्यक्ती कारागीरांकडून नारळांच्या झावळ्यांचा मांडव बनवून घेत आहेत. ज्यासाठी कारागीराच्या उपलब्धतेनुसार आणि कौशल्यानुसार पाच ते १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
देवकार्याच्या दिवशी वधूच्या घरी, हिरव्या मांडवात बोहले ( स्थानिक बोलीभाषेतील " भवले " म्हणतात. बोहले या शब्दाचा अपभ्रंश असावा ) घातले जाते. यासाठी घरासमोरील अंगण किंवा मोकळी जागा निवडली जाते. बोहले बांधण्यासाठी विटा आणि उपलब्धतेनुसार पांढऱ्या मातीचा उपयोग केला जातो. लग्न कार्यातही कृषी परंपरेला, त्यातील अवजारांना अनन्यसाधारण महत्व आहे. बोहले घालण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. या बोहल्याच्या निर्मितीसाठी पायरीजवळ वखराच्या खोडाचा उपयोग केला जातो. हे बोहले देखिल विशिष्ट मोजमापाचे असते. बोहले तयार करताना वधूच्या हाताचे मोजमापानुसार बोहल्याची लांबी रुंदी अडीच हात असते. आणि बोहल्याच्या पाठीमागील भागात विटांचे एकावर एक असे सात थर रचलेले असतात. वडिलधारी मंडळी सांगतात की, पूर्वी लग्न अशा बोहल्यावरच लागत असत. पाहूण्यांना बसण्यासाठी सावली म्हणून घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत, कापसाच्या पऱ्हाट्यांपासून किंवा तुराट्यांपासून बनवलेल्या ताटव्यांचे मांडव घातले जात. त्याची जागा आता सुसज्ज अशा मंडप डेकोरेशनने घेतली आहे. जर संपन्नता असेल तर अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मंगलकार्यालयाला पसंती दर्शविली जाते.
बोहले घालणे ( बांधण्याची ) ही कला प्रत्येकालाच जमते असेही नाही. बोहले बांधण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता एकमेकांच्या जिव्हाळ्यातून विनामुल्य बांधून दिले जातात. ग्रामीण भागात काही अंशी सहकार्याची भावना तग धरुन आहे. शहरी भागाप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागत नाही. लग्नकार्यासारख्या मंगल प्रसंगी ही भावना ठळकपणे अधोरेखित होते. शहरी भागातून बोहले हद्दपार झाल्यातच जमा आहे. नांदेड जिल्ह्याच्या बहूतांश भागात बोहले याकाळातही घातले जातात. लग्नकार्यासारख्या मंगल प्रसंगी अनेक प्रथापरंपरांची मनोभावे जोपासना केली जाते. कुळाचार म्हणूनही या प्रथापरंपरांच्या जोपासनेस प्राधान्य दिले जाते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.