निपाणी : दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील वाहने बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आज आणखी एक घटना घडली. महामार्गावरुन भरधाव येणारा ट्रक अपघातग्रस्त वाहनावर आदळला. या अपघातात एकजण जागीच ठार तर चौघेजण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ हा अपघात झाला. संभा इराप्पा फुटाणे (वय ५०, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) असे असे मृत व्यक्तीचे नाव असुन तिघांवर निपाणी येथे गांधी रूग्णालयात उरचार सुरु आहेत. त्यापैकी गंभीर जखमी असणाऱ्या एकाला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
अपघाताबाबत पोलिस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दोन दिवसापूर्वी उसाची ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकचा अपघात झाला होता. त्यामुळे अडकलेली ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रक बाजूला करण्याचे काम आज सकाळपासून सुरू होते. त्यासाठी हसूरचंपू येथील ट्रॅक्टर मालक व त्यांच्या गावातील काही नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. याचवेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संकेश्वरकडून नारळ भरून ट्रक (केए ०१ एजी २१८१) निघाला होता. मात्र घाटातील वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेजारी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जोरात धडकला. या अपघातात अनिल बाबुराव खवणे (वय, ३०), भीमा सोमा दुंडगे (वय ३५), अक्षय लक्ष्मण मस्ती (वय २५, सर्व रा. हसुरचंपू, ता. गडहिंग्लज) आणि जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाचे कर्मचारी नेताजी यादव (वय ५०) हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ निपाणी येथील गांधी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
संभा फुटाणे यांच्या छातीला जबरदस्त मार लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असणारे नेताजी यादव यांच्यावर गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. सायंकाळी उशिरा फुटाणे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अपघाती निधनाने हसुर चंपू गावावर शोककळा पसरली आहे.
यावेळी अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक आर. बी. शेख, राजू कोळी, प्रकाश तळवार, संदीप मल्लापा उमदु, सुदर्शन अस्की व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातानंतर ट्रकचालक पोलिसांच्या स्वाधीन झाला. निपाणी शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
महामार्गावर तासभर वाहतुकीची कोंडी
अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जय हिंद कंपनीतील भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.