पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! चोरांनी मारला पोलिस ठाण्यातच डल्ला; 185 मोबाईल आणि 7 लाखांची रोकड लंपास...

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर - शहरातील बॅंका, मंदिरे, बंगल्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र, पोलिस ठाण्यातच हातसफाई करून चोरट्यांनी यंत्रणेचे वाभाडे काढल्याची घटना जयसिंगपूर पोलिस ठाण्यात घडली आहे. बहुदा ही राज्यातील पहिलीच घटना असावी. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. सुमारे सात लाखांची रोकड आणि अंदाजे सहा लाख रुपयांचे १८५ मोबाईल चोरीला गेल्याचे खात्रीलायक समजते. चोरट्यांचा माग घेण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलिसांच्याच कार्यक्षतेपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात पाठीमागील बाजूने चोरट्याने गुरुवारी (ता.९) रात्री प्रवेश केला. 

कारकून कक्षातून मुद्देमाल पळविण्यात आला. 

कारकून कक्षेत गुन्ह्यातील हस्तगत साहित्य ठेवले जाते. यातील विविध कंपन्यांचे मोबाईल संच चोरट्यांनी पळविले. तसेच वाहतूक दंड तसेच इतर हस्तगत केलेली सुमारे सात लाखांची रोकड चोरट्यांनी लांबविली. मात्र, याबाबत माहिती देण्यास जयसिंगपूर पोलिसांनी टाळाटाळ केली. दरम्यान, घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ सुरू केली; मात्र जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशानंतर चोरीची नोंद जयसिंगपूर पोलिसांत शुक्रवारी (ता.१०) रात्री उशिरा केली. कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण तसेच जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. 
श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवरील दुकाने व शासकीय सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. अनेक दुकानदारांनी मध्यरात्री उठवून दुकानातील सीसीटीव्ही तपासले. दरम्यान, पोलिसांची पथके चौकशीसाठी रवाना झाली आहेत. शनिवारी दिवसभर पोलिसांचा तपास सुरू होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार कोल्हापूर आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. 

पोलिस ठाणेदेखील सुरक्षित नाहीत

या घटनेमुळे पोलिस ठाणेदेखील सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले आहे. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पुढाकार घेऊन शहरासाठी महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर जयसिंगपूर पोलिसांनी यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले नसल्याने आज अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत. या प्रकरणाचा तपास जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे करत आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी 

पोलिस ठाण्यातील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांवर नामुष्की ओढावली आहे. कोणत्याही परिस्थितीत चोरट्यांचा माग काढण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. यातून जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगले, पेठवडगाव, इचलकरंजीसह मिरज व सांगली परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 

फुटेज हाती 

पोलिसांनी शहरातील काही दुकानदारांना शुक्रवारी मध्यरात्री उठवून दुकानांसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. दरम्यान, एका ठिकाणी चोरट्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, तो एकटा असल्याचे यात दिसते. एक सॅक आणि पोते घेऊन जात असताना तो दिसल्याने त्याच्याभोवती तपास फिरू लागला आहे.

जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील चोरीप्रकरणी तपास सुरू आहे. काही धागेदोरे हाती लागले आहेत. श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी माहिती घेतली आहे. पथके विविध ठिकाणी तपास कार्यावर आहेत. लवकरात लवकर चोरट्यांचा माग काढू. 
-डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT