College Boy Murder In Sangli Neminathnagar
College Boy Murder In Sangli Neminathnagar 
पश्चिम महाराष्ट्र

किरकोळ वादातून सांगली येथे महाविद्यालयीन तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

सांगली - महाविद्यालयात शिक्षण घेत छायाचित्रकारितेचा व्यवसाय करणाऱ्या बसवराज सिद्धाप्पा लद्दे (वय 20, रा. बापट मळ्याशेजारी, आंबे प्लॅट सध्या रा. वॉन्लेसवाडी, गुंजाटे प्लॅट) याच्यावर मंगळवारी रात्री नेहमीच गजबलेल्या नेमीनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 

अत्यंत सुशिक्षितांची वर्दळ असलेल्या येथील क्रीडांगणावर सायंकाळच्या सुमारास खुनी हल्ला पहिल्यांदाच झाल्याने खळबळ उडाली असून, हा परिसर दहशतीखाली आला आहे. या हल्ल्यातील जखमी बसवराज याने उपचार सुरू असतानाच दिलेल्या जबाबाच्या आधारे पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. मारुती लक्ष्मण फोंडे (वय 19), रोहन रमेश काळे (वय 19), साहील सलीम शेख (वय 21, तिघेही रा. संजयनगर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार अमन मोकाशी आणि पापड्या (पूर्ण नाव नाही) हे दोघे पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

बसवराज हा आपल्या आईसह सध्या बापट मळ्याजवळील आंबे प्लॉट येथे भाड्याने राहत होता. घराजवळ ड्रेनेजचे पाणी आल्याने ते वॉन्लेसवाडीतील गुंजाटे चाळीत राहण्यास गेले. तो जी. ए. महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शिक्षणाबरोबरच त्याचा फोटो आणि व्हिडीओ शूटिंगचा व्यवसाय होता. काल 7 वाजता तो वॉन्लेसवाडीतील घरातून दुचाकीवरून (एमएच 10 सीव्ही 7598) बाहेर पडला. जुन्या घराचे वीज बिल आले आहे, ते घेऊन येतो, असे त्याने आईला सांगितले. त्यावेळी त्याला रोहन काळे याचा फोन आला. त्याने नेमिनाथनगर येथील कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ बोलवले. आठच्या सुमारास तो नेमिनाथनगर येथे मैदानावर आला. यावेळी किरकोळ कारणातून त्यांच्यात बाचाबाची झाली. रोहनसोबत आलेल्या इतरांनी त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित अमन मोकाशी याने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात बसवराज गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसवराजवर खुनी हल्ला झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

ही माहिती समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बसवराजने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाब दिल्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. अन्य दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. 

कष्टकरी आईच्या अश्रुंचा महापूर 
बसवराज लद्दे... महादेवी लद्दे या एका कष्टकरी आईचा एकुलता एक मुलगा. आईने कौटुंबिक संकटातून मार्ग काढत त्याला मोठा केला. अनेक घरची धुणी-भांडी करून त्याला शिक्षण दिले. ना कुणाची साथ होती, ना कुणाचा डोक्‍यावर हात होता. माय-लेकांनीच एकमेकांना आधार दिला होता. बसवराज आता कुठे कमवायला लागला होता. आईने आता धुणी-भांडी करू नयेत, असा आईला तो सांगत होता. त्याने स्वतःच्या कमाईतून दुचाकी घेतली होती. कमवून तो शिकत होता. त्याच्या धामणी रस्त्यावरील राहत्या घरी ड्रेनेजचे पाणी शिरले आणि त्यांना घर बदलावे लागले. या घडामोडींत त्याचे मित्रांशी काय बिनसले होते, त्याचे कोणी का शत्रू झाले, जीवावर उठावे इतके त्याने काय केले होते, याची कल्पनाच त्या माऊलीला नाही. हाताशी आलेला कर्ता मुलगा डोळ्यासमोरून कायमचा निघून गेल्याने आई आणि त्याची वृद्ध आजी सुन्न झाली आहे. तिच्या अश्रूंचा महापूर थांबायला तयार नाही. वॉन्लेसवाडी येथील बहिणीकडे त्या रहायला गेल्या आहेत. त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले आहे. मुलाबद्दल पाहिलेली स्वप्नेही चक्काचूर झाली आहेत. माझ्या पोराचा गुन्हा काय, त्याने कोणास काय केले. याबाबत कोणी मला विचारायला पण का आलं नाही, असा या मातेचा टाहो सुन्न करणारा आहे... पण याचे उत्तर कोणाकडेच नाही... किरकोळ कारणावरून मारेकऱ्यांनी एक फुलणारे घर उद्‌ध्वस्त केले. 

मी देखील सुन्न आहे... 
जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,""महाविद्यालयीन तरुणांनी केलेला हा प्रकार सुन्न करणारा आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत तरुणाईची मजल जात आहे. त्यामुळे महाविद्यालयांत जाऊन या तरुणाईशी संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये शिक्षक, पालक या सर्वांनीच तरुणाईतील वाढती व्यसनाधिनता आणि गुन्हेगारी याबद्दल समुपदेशन करण्यासाठी आम्ही आता पाऊल उचलणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT