Due to Excess rainfall crops destroyed Top Marathi News
Due to Excess rainfall crops destroyed Top Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

पंचनाम्यांचा फेरा नको; सरसकट मदत द्या ; बळिराजाची आर्त विनवणी

विकास जाधव / विशाल पाटील

सातारा ः पावसाने जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले. महापूर, अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी सावरतोय, तोच पुन्हा परतीच्या पावसाने हातातोंडाला आलेले पिके वाहून नेली. अतिपावसाने पीकवाढीचा जोर घटला अन्‌ परतीच्या पावसाने त्याला भुईसपाट केले. बळिराजाचे काळीज असलेले पीक रानातच कुजले. कोट्यवधींचे नुकसान झाल्यामुळे तो पुरता बेजार झाला आहे. काळीज जळालेला शेतकरी मदतीसाठी आ वासून आहे. पण, "काळजी'वाहू सरकार केवळ पंचमान्यांचा बागुलबुवा करण्यात मश्‍गुल आहे. पंचनाम्यांचा फेरा नको; तर सरसकट मदत द्या, अशीच मागणी हतबल बळिराजा करतोय. 


गेल्या चार महिन्यांपासून पावसाने भयानक रूप दाखविले. अतिवृष्टी, परतीचा व सध्याच्या वादळी पावसामुळे शेती होत्याची नव्हती झाली. जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवातीपासूनच अडचणी सुरू झाल्या. उशिरा पावसाच्या आगमनाने पेरण्याही उशिरा झाल्या. जिल्ह्यात तीन लाख चार हजार 810 हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच 86 टक्के पेरण्या झाल्या. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृष्णा, कोयना नद्यांना महापूर आले. बहुतांश नद्यांनी पूर मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे नदीकाठची शेती बुडाली. तसेच अतिपावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. ऑगस्टपर्यंत कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांत 22 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. या झालेल्या नुकसानीची आजवर मदत मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी स्वत:ला सावरतोय, तोच ऑक्‍टोबर महिन्यात पिके काढणीला आली असतानाच परतीच्या तसेच वादळी पावसाने झोडपून काढले. या नुकसानीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. पहिले पंचनामे पूर्ण होताच आता दुसऱ्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामकाज सुरू झाले आहे. 

 

द्राक्षे फुटली, सोयाबीन कुजलं 

अतिपावसामुळे द्राक्षांचे घड फुटले. मुसळधार पावसामुळे डाळिंबाची फुलगळ झाली असून, डाळिंबे येतील की नाही, याची शाश्‍वतीच राहिली नाही. स्ट्रॉबेरी लागवडीस उशीर झाला असून, पाणी साचल्याने वाढीवर परिणाम झाला. काहींची ज्वारी, बाजरी काळी पडली आहे, तर बहुतांश कणसाला पुन्हा फुटवे आले आहेत. अतिपावसामुळे भात पीक झडले आहे. काढणीही करता येत नसल्याने भात पीक कुजू लागले आहे. सततच्या पावसाने सोयाबीन पीक अक्षरशः कुजले आहे. आले पिकात पाणी साचून राहिल्याने कुंदकुज किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. लागवडीतील सुमारे 30 टक्‍के क्षेत्रातील पिके काढावी लागली. द्राक्ष उत्पादक काही शेतकऱ्यांनी आधीच व्यापाऱ्यांशी व्यवहार केले होते. त्यात 110 रुपये किलोने दर ठरलेली द्राक्षे अवघ्या दहा रुपये दराने व्यापाऱ्यांना द्यावी लागली. काही शेतकऱ्यांना तर द्राक्षे फेकून द्यावी लागली. 

 

"महसूल, ग्रामविकास'चे दुर्लक्ष 

ऑगस्टमध्ये ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू होते. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्याने महसूल प्रशासन त्यात मश्‍गुल झाले. त्यावेळीही कृषी विभागाने पंचनामे करण्याचे काम केले. आता पुन्हा एकदा पंचमान्यांचे काम सुरू असताना महसूल, ग्रामविकास विभागाकडून केवळ "फौजदारकी'चे कामकाज सुरू असल्याची टीका होताना दिसत आहे. त्यांचे कार्यालयातून कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांत अन्याय होण्याची भीती आहे. 

 

पुरणार कसा कृषी सहायक 

सरासरी चार गावांसाठी एक कृषी सहायक कार्यरत आहे. प्रत्येक गावात शेकडो एकर जमिनी असून, बहुतांश शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जावून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणे, शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणे या कामांसाठी ते कसे पुरणार? निवडणुकीच्या कामासाठी सर्वच प्रशासन दावणीला बांधले जाते, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का प्रशासन झटून काम करत नाही, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचमाने करण्यास अजूनही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 

 

पिकंच नाही तर दाखवू काय? 

बहुतांश शेतकऱ्यांचा शेती हाच आर्थिक आधार असतो. आधीच त्याला फटका बसलेला आहे. अनेकांचे सोयाबीन, भुईमूग, भात आदी पिके वाया गेली. काहींनी सोयाबीन काळे पडले असतानाही कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागण्यासाठी निम्म्या दराने विक्री केली. सततच्या पावसामुळे मशागतीची, भांगलणीची कामे करता आली नाहीत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा काढणीचा खर्च जादा झाला. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करण्यासाठी नुकसान झालेली पिके काढली आहेत. अतिपावसामुळे काहींच्या शेतात पिकेच राहिली नाहीत, त्यामुळे पिकंच नाही, तर पंचमान्यात दाखवू काय, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. 

 

सत्ता अन्‌ मदतीही पेचात 

राज्यकर्त्यांमध्ये सत्तास्थापनेचा पेच सुरू आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपत असल्यामुळे आता काळजीवाहू सरकार कामकाज पाहील. अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मदत किती मिळणार, कशी मिळणार, कधी मिळणार, याबाबतही पेच निर्माण झाला आहे. मदत जाहीर करण्यापेक्षा मदत देवून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी, त्यांना रब्बी हंगामासाठी पैसे उपलब्ध होतील, याकडे या काळजीवाहू सरकारने लक्ष दिले पाहिजे. 

 

सरसकट का..? 

कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरणी झाल्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वच शेतांच्या बांधावर जातील, याला मर्यादा आहेत. शिवाय, सर्वच शेतकऱ्यांना स्वत: अर्ज करणे हेही जमेल, असे नाही. तसेच वाया गेलेली पिकेही शेतातून काढली आहेत. अनेकांच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणी आणि नुकसानीचे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी पुढे येत आहेत. 


नुकसानीचे नजर अंदाज क्षेत्र (गुरुवारअखेर) : 28,637 हेक्‍टर 
अतिवृष्टीने ऑगस्ट महिन्यातील नुकसान : 28 हजार हेक्‍टर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT