Eco friendly ganesh idols in america
Eco friendly ganesh idols in america 
पश्चिम महाराष्ट्र

इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’

सुधाकर काशिद

कोल्हापूर : गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने काही महाराष्ट्रीयन अमेरिकेत राहत असले; तरी भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ ते या ना त्या पद्धतीने जपत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून शीतल यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. दोन वर्षांचा अनुभव पाहता न्यू जर्सीच्या आसपास शंभर-दोनशे किलोमीटर परिसरात राहणारे सुमारे ४० भारतीय या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाणार आहेत.

मूर्ती तयार करताना शीतल यांनी अमेरिकेतील पर्यावरणाचे सर्व निकष पाळले आहेत. मूर्ती विरघळणाऱ्या आहेत आणि रंग रासायनिक नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. तेथील विसर्जनाची पद्धत सार्वजनिक पाणीसाठ्याऐवजी बागेत, पाण्याच्या बादलीत विसर्जन करण्याची आहे. सर्व मूर्ती एक ते दोन फूट उंचीच्या व बैठ्या सिंहासनावरील आहेत.

शीतल येथील प्रतिभानगर परिसरातील रेड्याच्या टकरीजवळ राहणाऱ्या. शरद व सुलभा देशपांडे यांच्या त्या कन्या. चित्रकला व शिल्पकलेची त्यांना मुळातच आवड. येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. विवाहानंतर पती प्रसाद यांच्यासोबत त्या अमेरिकेत गेल्या. पहिले वर्ष त्या गणेशोत्सवात अस्वस्थ राहिल्या. आपण गणेशोत्सवाच्या आनंदाला मुकलो, याची चुटपूट त्यांना लागली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच गणेशमूर्ती तयार केली आणि तिची प्रतिष्ठापना केली. 

रोज सकाळी-संध्याकाळी शेजारच्या दोन-तीन कुटुंबांतील लोकांना सोबत घेऊन तालासुरात आरतीही होऊ लागली. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःसाठी आणि इतर परिचितांसाठी मूर्ती तयार केल्या. साधारणपणे २० ते २५ भारतीयांनी या मूर्ती नेऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतला. यंदा त्यांनी तीस ते पस्तीस सुबक मूर्ती तयार केल्या आहेत. महिनाभर त्यांचे हे काम घरातल्या घरात चालू आहे. आता त्यांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. अंगणातच त्यांनी हा स्टॉल मांडला आहे. नुसत्या मूर्तीच नव्हे; तर खीर, मोदक, करंज्यांसाठी लागणारे सर्व साहित्यही आणले आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे एक वेगळ्या आनंदाची अनुभूती असते. त्यामुळे अमेरिकेत राहत असलो; तरी आपल्या परीने या सणाचा आनंद घेण्यासाठी त्यांची धडपड आहे.

गणेशोत्सवासारखा आनंदी सोहळा व धमाल दुसऱ्या सणात नाही. कोल्हापुरात लहानपणापासून गणेशोत्सवात मी सहभागी होत राहिले. मूर्तीची प्रतिष्ठापना, आरास, विसर्जनाची धमाल यात सहभागी झाले. आता मी काही काळ भारतापासून दूर आहे; पण माझ्या परीने केवळ माझ्यासाठी नव्हे, तर इथल्या इतर भारतीयांनाही या सणाचा आनंद घेता यावा, यासाठी मूर्ती तयार केल्या आहेत.

- शीतल बागेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT