पश्चिम महाराष्ट्र

Father's Day : वडिलांच्या प्रेरणेतून लेकींना ध्यास सुवर्णपदकांचा

प्रमोद फरांदे

कोल्हापूर - आई-वडिलांनी मुलांचे गुण ओळखून त्यांच्यात स्वप्न पेरले, जिद्द निर्माण केली तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय कसबा बावड्यातील सामान्य कुटुंबातील मृणाल आणि मृदुला कांबळे या दोन बहिणींकडे पाहिल्यानंतर येतो. या दोघींनी वडील नितीन कांबळे यांच्या प्रेरणेतून पिन्चॅक सिलॅट मार्शल आर्टस्‌ स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

मृणालने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, एशियन, वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा स्पर्धांतून २० हून अधिक सुवर्णपदके मिळविली, तर छोटी मृदुला (वय ११) हिने राज्य, राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही बक्षिसे मिळविली आहेत. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकच्या प्रदर्शनीय सामन्यात निवड होण्यासाठी, तसेच २०२२ मध्ये चीन येथील एशियन गेमसाठी मृणाल वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मेहनत घेत आहे, तर वडिलांनी एशियन गेम, ऑलिंपिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळविण्याचा संकल्प केला आहे. 

बावड्यातील नितीन कांबळे हे हिवतापनिर्मूलन विभागात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहेत. बॉक्‍सिंग आणि कराटेचे खेळाडू असलेल्या नितीन यांना मृणाल आणि मृदुला या दोन मुली आहेत. मृणाल महावीर महाविद्यालयात बीएस्सी दुसऱ्या वर्गात, तर मृदुला सहावीत शिकते. नितीन यांनी दोघींची आवड ओळखून त्यांना खेळात उतरविले. पिन्चॅक सिलॅट हा मूळचा इंडोनिशियाचा खेळ जगभर खेळला जात आहे. 

या खेळाची २०२० रोजी ऑलिंपिकच्या प्रदर्शनीय सामन्यासाठी निवड झाली आहे. त्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये या खेळाला पदके दिली जाणार आहेत. मृणाल आणि मृदुला या दोघींही पिन्चॅक सिलॅट मार्शल आर्टस्‌चा खेळ खेळतात. मृणालने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह एशियन गेम, एशियन चॅम्पियनशिप २०१८ मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेऊन जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक प्राप्त केला. तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून २० सुवर्णपदके मिळविली आहेत. केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने प्रशिक्षणासाठी मृणालला इंडोनेशियाला १० दिवसांसाठी पाठविले होते. २०२० मध्ये ऑलिंपिकच्या प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होण्याचा, तर २०२२ मध्ये चीन येथील एशियन गेममध्ये सुवर्णपदक मिळविण्याचा तिचा ध्यास आहे. रोज आठ ते नऊ तास वडिलांच्या नेतृत्वाखाली कसून सराव करते. मृणालची आई मनीषा याही मुलींना प्रेरणा देण्याबरोबरच त्यांना मदत म्हणून खासगी एनजीओत नोकरी करतात.

वडील काढतात कर्ज 
कर्ज काढून देश, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुलींना पाठवित आहे. त्यांच्या आहारावर लक्ष ठेवत आहे. कर्ज काढायचे आणि मुलींना स्पर्धेसाठी पाठवायचे, असे हे दहा वर्षे सुरूच आहे, पण डोक्‍यावरील वाढणाऱ्या कर्जापेक्षा त्यांचे लक्ष मुलींच्या खेळावर अधिक आहे. 

इतर मुलांनाही प्रेरणा 
नितीन कांबळे हे केवळ आपल्या मुलींच्या खेळावरच लक्ष देतात असे नाही, तर इतर मुलांनाही ते घडवित आहेत. त्या मुलांच्या पालकांना प्रेरणा देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ मुलांनी एशियन गेममध्ये पदके मिळवली आहेत.

वडील आमचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही दोघी बहिणी खेळाकडे वळलो. २०२२ एशियन गेम, २०२४ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवायचे, हे स्वप्न समोर ठेवून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहोत. आमच्या यशामागे आई-वडिलांची कठोर मेहनत आहे.
- मृणाल कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT