सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगामात 65-70 टक्के बागातील फळांची काढणी पूर्ण झाली आहे. हंगामाच्या सांगतेतही दरातील घट कायम आहे. इंधनदरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या चार किलोच्या पेटीला 130 ते 140 तर निर्यातक्षम द्राक्षांना 180 ते 220 रुपये पेटीला दर मिळत आहे. दरातील घसरणीची चिंता कायम आहे. यंदाच्या हंगामातील देणीच भागत नाहीत मग पुढील हंगामांच्या स्वप्नांचा तर चक्काचूरच अशी स्थिती झाली आहे.
द्राक्ष हंगाम फेब्रुवारीपासून जोमाने सुरू झाला. अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या अफवा, निर्यातीवर आलेल्या मर्यादेमुळे यंदा व्यापाऱ्यांना शोधायची वेळ बागायतदारांवर आली. अनेक शेतकऱ्यांनी दर न ठरवता केवळ बागा घालवण्यासाठी प्राधान्य दिले.
अवकाळी, अतिवृष्टी, धुके, कोरोना संकट, निर्यातीवरील अनुदान कपात, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासनाकडून लॉकडाऊनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आली.
50 टक्के विक्री, 25 टक्के खराब
जिल्ह्यात सुमारे 32 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. सद्यस्थितीत 50 टक्के बागांची विक्री झाली आहे, तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे 25 टक्के माल खराब झाला. उर्वरित 25 टक्के क्षेत्रातील बागा शिल्लक आहेत. तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील हंगाम सांगतेकडे वाटचाल सुरु आहे. पलूस तालुक्यातील हंगामानेही वेग घेतला आहे.
उत्पादन खर्च दुप्पट...
उत्पन्न वाढवण्याच्या नादात, उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. कुठेतरी चुकतंय. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, असे सरकारने सांगितलं. प्रत्यक्षात उत्पादन खर्च दुप्पट करून जे होतं ते उत्पन्नदेखील हातातून जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत म्हणजे फक्त ज्यांचे कडे गाड्या आहेत त्यांचं नुकसान नाही. सगळ्यात मरण आहे ते शेतकऱ्यांचे. दरवर्षी प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या प्रमाणात शेतमालाचे दर कमी घोषित करून लुटणे सुरू आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.