कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे जयंत दिनकर आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. काल सकाळी ११ वाजता त्यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. संध्याकाळी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्री. आसगावकर हे शिक्षण संस्थाचालक संघटनेचे सचिव आहेत. दरम्यान, शिक्षक मतदारसंघाची कोल्हापूरला काँग्रेसपक्षातर्फे प्रथमच उमेदवारी मिळाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान १ डिसेंबर रोजी आहे. सांगरूळ (ता.करवीर) येथील जयंत आसगावकर हे कुडित्रे येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजमध्ये
प्राध्यापक आहेत. तसेच शिक्षण संस्थाचालक संघटनेचे सचिव आहेत. शैक्षणिक व्यासपीठ व अन्य संघटनांच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असतात. आज त्यांनी पुणे येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत शैक्षणिक व्यासपीठचे सर्जेराव लाड, डी. बी. पाटील, व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, डी. जी. खाडे, शिवाजी चौगुले यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अर्ज भरणारे ते पहिलेच उमेदवार आहेत. संध्याकाळी त्यांचे नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. काँग्रेसचे जनरल सेक्रेट्री मुकूल वासनिक यांच्या सहीच्या पत्रामध्ये जयंत आसगावकर यांच्या नावाचा उल्लेख आहे.
जिल्ह्यातील सुटाचे प्रा. डॉ. सुभाष जाधव हेदेखील शिक्षक मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत. त्यांना पुरोगामी आणि डाव्या शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा आहे. पुरोगामी शिक्षक संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष दादा लाड हेदेखील या निवडणुकीसाठी इच्छुक असून, जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभारही निवडणूक लढवणार असून, त्यांनी उमेदवारी अर्जही आणला आहे. लवकरच अर्ज भरणार आहेत. आसगावकरांच्या निमित्ताने शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी कोल्हापूरला मिळाली आहे.
मंत्री सतेज पाटील यांची कसोटी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी कोल्हापूरला द्या. पुढचे सर्व मी बघतो, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये केले होते. पक्षाने जयंत आसगावकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता त्यांना निवडून आणण्याचे मंत्री पाटील यांच्यासमोर आव्हान आहे.
महाआघाडीत बिघाडीची शक्यता
काँग्रेसने पुणे मतदारसंघाची आसगावकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाआघाडीत बिघाडीचे चित्र तयार झाले. या मतदारसंघात पदवीधरची जागा कायम ठेवतानाच शिक्षक मतदारसंघही सोडावा. त्या बदल्यात अन्यत्र जागा सोडू, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता, मात्र काँग्रेसने उमेदवारी जाहीर करीत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी उद्या निर्णय जाहीर करणार असून, विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना पुरस्कृत करणार की नाही, हेही स्पष्ट होईल.
शिक्षक मतदारसंघ निवडणूक
सांगरुळ शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे.मतदारसंघातील पाच जिल्ह्यांत ७२ हजार मतदान आहे, यातील सुमारे पन्नास हजार शिक्षकांशी संपर्क आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी विविध प्रश्न मांडले आहेत.
- प्रा. जयंत आसगावकर
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.