The Corona Graph Grew In Ten Days To Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला दहा दिवसांत वाढला कोरोनाचा आलेख

अजित माद्याळे

गडहिंग्लज : पहिल्या लॉकडाउनपासून आजअखेर गडहिंग्लज तालुक्‍यात मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यांतून दाखल झालेल्यांची संख्या 16 हजार 215 इतकी आहे. केवळ गेल्या दहा दिवसांतच कोरोना बाधितांचा आलेख वाढला असून ही संख्या 73 वर पोहोचली आहे. यांतील तिघांचा बळी गेला आहे. दोन महिने कोरोनामुक्त ठेवलेल्या गडहिंग्लज तालुक्‍यात कोरोना बाधितांचा आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित 31 गावे कोरोना भीतीच्या छायेत वावरत आहेत. 

गावागावांतील दक्षता समितीसह प्रशासनातील विविध विभागांच्या प्रयत्नामुळे गडहिंग्लज तालुक्‍याला दोन महिने कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळाले. मे महिन्यात शासनाने कामगारांना आपापल्या घरी जाण्यास परवानगी दिली. 1 मेपासून आजअखेर तालुक्‍यात पाच हजार लोक गावी आले आहेत. यामध्ये मुंबईची संख्या सर्वाधिक असून त्या खालोखाल पुणेकरांची आहे. 

मुळात मुंबई, पुण्यातील संख्या हजारो पार गेल्यानंतर तेथून येणाऱ्या लोकांमुळे गावागावांत कोरोना पोहचणार हा धोका गावकऱ्यांना आधीच लक्षात आला होता. कालांतराने ते खरेही ठरले; परंतु दक्षता समितींनी बाहेरून आलेल्यांचे प्रबोधन करून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईनसाठी तयार केले. मे महिन्यात आलेल्या चाकरमान्यांतील 73 लोक आजअखेर कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत. दुर्दैवाने चन्नेकुप्पी, यमेहट्टी व हेब्बाळ जलद्याळ येथील तिघांचा क्वारंटाईनमध्ये असतानाच मृत्यू झाला.

आधी मृत्यू आणि नंतर कोरोना बाधित म्हणून अहवाल आल्याने तालुक्‍याला धक्का बसला. अजूनही मुंबई, पुण्याहून लोक गावाकडे येत आहेत. बाधितांचा आकडा वाढण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविली जाते. मृत्यू झालेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. इतर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असल्याने सध्या क्वारंटाईनमध्ये असलेल्या इतर आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

सामूहिक संसर्ग नाही 
प्रशासन आणि गावागावांतील दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेरून आलेल्यांपासून खबरदारी घेत सर्वांना क्वारंटाईन सक्तीचे केले. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व बाहेरून आलेल्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडले; परंतु गावच्या सुरक्षेसाठी खंबीर भूमिका घेऊन प्रशासनाच्या सूचनेनुसार दक्षता समितींनी क्वारंटाईनवरच भर दिल्याने स्थानिक सामूहिक संसर्ग रोखण्यात आतापर्यंत तरी यश आले आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

"स्वॅब'चा घोळ... 
रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घेण्याचे ठरवून कार्यवाही सुरू झाली. सुरूवातीला सर्वांचे स्वॅब घेतलेही; परंतु क्वारंटाईनचा कालावधी संपला तरी त्याचे अहवाल लवकर येईनासे झाले. हा प्रश्‍न जिल्हा प्रशासनासमोर मांडल्यानंतर अहवाल गतीने यायला लागले. तरीसुद्धा अजून पाचशेच्यावर स्वॅब अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय तपासणी यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन लक्षणे असणाऱ्यांचाच स्वॅब घेण्याचे ठरले; परंतु त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले; मात्र कालावधी संपल्यानंतर त्यांना मात्र तपासणीअंती लगेच घरी सोडले जात होते. दुसरीकडे स्वॅब दिलेल्यांना मात्र अहवाल येईपर्यंत क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्याने क्वारंटाईनबाबत दुजाभावाची भावना निर्माण होऊन पुन्हा दक्षता समितीवरच त्याचे खापर फोडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. 

कोरोना रुग्णांची 31 गावे 
कोरोना रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये गिजवणे, चन्नेकुप्पी, महागाव, भडगाव, बड्याचीवाडी, कळवीकट्टे, शेंद्री, यमेहट्टी, मुंगूरवाडी, नरेवाडी, तेरणी, शिप्पूर तर्फ आजरा, शिप्पूर तर्फ नेसरी, हेब्बाळ जलद्याळ, हसूरवाडी, हनिमनाळ, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, लिंगनूर कसबा नूल, डोणेवाडी, काळामवाडी, बेळगुंदी, कुमरी, सांबरे, तावरेवाडी, हडलगे, उंबरवाडी, कडगाव, उंबरवाडी, अर्जुनवाडी, कौलगे यांचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT