Discussion Among Traders About Sunday Holiday Kolhapur Marathi News
Discussion Among Traders About Sunday Holiday Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांची मुले 'रविवार माझ्या आवडीचा' म्हणतील...?

अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाउनमुळे अनेक घटक जसे अडचणीत आले, त्याच पद्धतीने लोकांनी काही चांगल्या गोष्टीही अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडहिंग्लजचा आठवडा बाजार तसा रविवारी भरतो. आता कोरोनामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी रविवार कडकडीत बंदचा निर्णय घेतला आहे. हाच निर्णय भविष्यातही कायम ठेवून रविवारचा आठवडा बाजार आणि संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याच्या मानसिकतेत व्यापारी आहेत. सर्वच व्यापारी बांधवांना कुटुंबाला वेळ देणे शक्‍य व्हावे, हा हेतू यामागचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

शाळांची सुटी रविवारी असल्याने सर्वच मुलांना "रविवार माझ्या आवडीचा' वाटतो. परंतु, गडहिंग्लजमधील व्यापारी बांधवांच्या कुटुंबातील मुलांची भावना मात्र "रविवार माझ्या नावडीचा' अशीच आहे. कारण, या दिवशी मुलांचे पालक त्यांच्यासोबत नसतात. शहरातील बाजारपेठ आठवडा बाजारामुळे रविवारी फुल्ल असते. यामुळे व्यापारी बांधवांना रविवारी दुकान उघडल्याशिवाय पर्याय नसतो. प्रत्येक मंगळवारी बाजारपेठ बंद असली तरी त्या दिवशी मुलांची शाळा असते. यामुळे व्यापारी असलेल्या पालकांना मुलांसाठी वेळ देणे अशक्‍य ठरत असल्याची भावना आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारचा आठवडा बाजारासह बाजारपेठही बंद केली तर..? या प्रश्‍नावर मध्यंतरी एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडविण्यात आली, परंतु त्यावेळी हा मुद्दा चर्चेच्या मर्यादेपर्यंतच राहिला. 

आता कोरोनाचा कालावधी आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर व्यापारी पेठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरात रुग्ण आढळल्याने आठवड्यातील रविवार कडक लॉकडाउन पाळण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्याच पुढाकाराने झाला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र मंगळवारी पेठ सुरू राहणार आहे. आता मुद्दा आहे तो रविवारचा. भविष्यात मंगळवारऐवजी रविवारीच बाजारपेठ बंदचा विचार व्यापाऱ्यांच्या मनात घोळत आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा सोशल मीडियावरच तशी चर्चा सुरू आहे. त्यावर बहुतांश जणांनी चर्चेत सहभाग घेऊन मत-मतांतरे मांडत आहेत.

व्यापाऱ्यांच्या मनातील ही भावना संपूर्ण शहर आणि तालुक्‍याला समजणेही गरजेचे आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रमुख लोकांची आणि व्यापाऱ्यांची समन्वय बैठकही आवश्‍यक आहे. रविवार बंदचा निर्णय घेतल्यानंतर कोणकोणत्या घटकांवर परिणाम होणार, बाजारासाठी दुसरा दिवस निवडताना तो प्रत्येक घटकांच्या सोयीचा आहे की नाही, हे मुद्देसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी व्यापक चर्चा व्हायला हवी. गडहिंग्लजकरांनी नेहमीच चांगल्या संकल्पनांना बळ दिले आहे. व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबासंदर्भातील असणारा हा मुद्दाही निश्‍चित ते मनावर घेऊन त्यास संमती देतील, यात शंका नाही. 

काय म्हणतात नेटीझन्स... 
- ठराविक व्यापाऱ्यांच्या मतांवर हे शक्‍य नाही 
- किरकोळ विक्रेता ते मोठ्या बझारपर्यंतच्या घटकांचा सहभाग हवा 
- संपूर्ण गावाला विश्‍वासात घ्यावे लागेल 
- पालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावसभा हवी 
- वर्षानुवर्षाची परंपरा खंडित करताना त्याच्या परिणामांवर चर्चा व्हायला हवी 
- विशेष करून नोकरदारांची सोय पाहिली पाहिजे 
- आठवडा बाजारासाठी शनिवार, मंगळवारचा पर्याय समोर 
- केवळ सोशल मीडिया नको, तर चर्चेसाठी प्रभावी व्यासपीठ तयार व्हावे

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT