कोल्हापूर : कोरोनामुळे शाळा सुरु करण्याबाबतचे धोरण अजुनही निश्चित नाही. त्यामुळे कधी ना कधी शाळा सुरु कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळात सुरु असणाऱ्या अलगीकरण कक्षांना पर्यायी व्यवस्था तयार करावी, असे आदेश विभागीय उपायुक्त पी. बी. पाटील यांनी दिले.
कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्व विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. श्री.पाटील यांचे जिल्हा परिषदेत आगमन झाल्यानंतर अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा आढावा व पुढील तयारी याचा आढावा घेण्यासाठी उपायुक्त श्री.पाटील सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी किणी टोल नाका, संजय घोडावत कॉलेज येथील कोवीड केअर सेंटर तसेच शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे आरोग्य वर्धीनी केंद्र , डॉ. एन. डी. पाटील कॉलेज पेरीड, ग्रामपंचायत कडवे, पंचायत समिती शाहूवाडी येथे भेट देवून कोरोना उपाय योजनांचा आढावा घेतला. यानंतर दुपारी जिल्हा परिषदेत सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत मार्गदर्शक सुचना केल्या.
श्री.पाटील म्हणाले, ""कोरोना कधी जाणार याबाबत निश्चित खात्री देता येत नाही. त्यामुळे शाळाही खूप दिवस बंद ठेवता येणार नाहीत. शाळा केंव्हाही सुरु होऊ शकतात. मात्र ग्रामीण भागातील शाळांचा वापर हा संस्थात्मक अलगीकरण कक्षासाठी होत आहे. त्याला पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच कोरोनासाठी देण्यात येणाऱ्या निधीवर मर्यादा आहेत. राज्य शासनाने सर्वच विकास कामांचे बजेट कमी केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामासाठी जिल्हा परिषदेने किमान 1 कोटी रुपयांची तरतूद करावी. या रक्कमेचा विचार करुन अंदाजपत्रकात दुरुस्ती करण्याची सुचनाही त्यांनी केली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, राजेंद्र भालेराव, प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, किरण लोहार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होते.
बाहेरून आलेल्यांना रोहयोतून रोजगार द्यावा
परराज्यातून व पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तसेच इतर रोजगार संधी उपलब्ध करून देणे बाबत विशेष प्रयत्न करावेत, अशी सुचना उपायुक्त श्री.पाटील यांनी केली. कोमॉर्बेडिटी म्हणजे डायबेटीस, कॅन्सर, हायपर टेंशन, दमा इ. रुग्णांची योग्य ती काळजी घेवून त्यांच्यावर वेळेत उपचार करावेत, अशी सुचना त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.