कोल्हापूर : घराणेशाही पुन्हा डोके वर काढणार, हे वास्तव आहे. उमेदवारीवरून घराण्यात रुसवे-फुगवे सुरू आहेत. नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालायची, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. त्यातही अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित झालेल्या प्रभागात प्रभागाबाहेरील उमेदवार चाचपणी करू लागले आहेत. त्यातून स्थानिक व बाहेरचे या संघर्षाची ठिणगी पडली आहे.
महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी इच्छुकांच्या भाऊ गर्दीने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पाच वर्षातील नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा डोळ्यासमोर ठेवून रिंगणात कोणाला पुढे चाल द्यायची, याचे आडाखे बांधले जात आहेत. प्रभागात कामाचा उरक चांगला असला तरी वर्तनात कसूर करणाऱ्या नगरसेवकांची अडवणूक सुरू झाली आहे. घरातच उमेदवारांची संख्या वाढल्याने त्यांना थोपविण्याचे आव्हान ही नेत्यांसमोर आहे.
नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा विडा उचलत उमेदवारांनी पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढवली. विजयाचा गुलाल अंगाला लागल्यानंतर प्रभागातील कामांचा निपटारा करण्यावर त्यांचा भर राहिला. प्रभागाचा आकार, गट-तट, विरोधक लक्षात घेत गटारी, रस्ते डांबरीकरण, उद्याने यांची कामे केली. काही नगरसेवकांकडून मतदारांचा अपेक्षाभंगही झाला. निवडणुकीत गुलालाने माखलेला विजयी चेहरा दाखवल्यानंतर ते पुन्हा मतदारांकडे फिरकलेच नाहीत.
साहजिकच मतदारांचा रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. निवडणूक जाहीर होणार असल्याने काहींनी शेवटच्या वर्षात कामे करून मतदारांची मन राखण्याचा प्रयत्नही केला. प्रभागात ‘इमेज’ तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी त्याची दखल आता नेते घेतील, अशी स्थिती आहे. महापालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांना हक्काच्या प्रभागातून ‘डच्चू’ मिळाला आहे. खुल्या प्रवर्गासाठीचे प्रभाग अनुसूचित जाती-जमाती करता आरक्षित झाल्यानंतर अनेकांची कोंडी झाली आहे. हे नगरसेवक ‘सेफ’ मतदारसंघ म्हणून शेजारच्या मतदारसंघात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा - इच्छुकांच्या ‘माय स्टोरी’ची भागात होतीये चर्चा
प्रभागात ‘कॅरेक्टर’ गमावलेल्यांना पुन्हा संधी देण्याची मानसिकता नेत्यांची दिसत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अशा नगरसेवकांनी पक्ष जो उमेदवार देईल, त्यांच्या पाठीशी राहावे, अशी रणनीती आखली आहे. या नगरसेवकांच्या गोटातील कार्यकर्त्यांना भेटी-गाठीसाठी नेते आमंत्रित करत आहेत. संबंधित नगरसेवकांसह नव्या इच्छुकांना वेसण घालण्याचा खटाटोप केला जात आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.