कोल्हापूर : सात वर्षांपूर्वीची घटना, सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसरातील डॉ. सरनाईक यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असणारा एक रुग्ण अचानक चक्कर येऊन पडला. हृदयाची धडधड पूर्ण थांबली आणि तो बेशुद्ध झाला. तत्काळ त्याच्यावर "जीवन संजीवनी' अर्थात "बेसिक लाईफ सपोर्ट' हे शास्त्रीय पद्धतीचे प्रथमोपचार सुरू झाले. सुमारे तासभर या पद्धतीनुसार त्याची छाती दाबली जात होती. तत्काळ त्याला दुसऱ्या दवाखान्यात हलवण्याचा निर्णय झाला. पण, रुग्णवाहिका मिळत नव्हती. अखेर ती उपलब्ध होताच दुसऱ्या दवाखान्यात त्याला हलवले. त्याच्या बंद पडलेल्या हृदयामागचे निदान होताच औषधोपचार सुरू झाले आणि तो पूर्वपदावर आला.
मुळचा ठिपकुर्ली (ता. राधानगरी) येथील सचिन भोसले या तरुणाची ही कहाणी. मात्र, ती इथेच संपत नाही. कारण आपला पुनर्जन्म त्याने इतरांचे जीव वाचवण्यासाठी सार्थकी लावायचे ठरवले आणि 108 रुग्णवाहिकेवर तो चालक म्हणून रुजू झाला. सहा वर्षांत तो अनेकांसाठी देवदूत ठरला. अगदी कालपर्यंत अवचितवाडी (ता. राधानगरी) येथील एका गर्भवती माता आणि तिच्या मुलाला वाचवण्यापर्यंत त्याचा हा प्रवास सुरूच आहे.
सचिन तसा सधन शेतकरी कुटुंबातला. पुण्यात कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत होता. पुढे कोल्हापुरात आल्यानंतर एका शस्त्रक्रियेच्या निमित्ताने त्याला डॉ. सरनाईक यांच्याकडे ऍडमिट केले होते आणि त्यादरम्यान 9 नोव्हेंबर 2013 ला त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ही घटना घडली. तो चक्कर येऊन पडला आणि त्याच्या हृदयाची धडधड थांबल्याचे लक्षात येताच दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती डॉक्टरांना दिली. डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. कपील शिंदे, डॉ. घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रथमोपचार सुरू केले. "जीवन संजीवनी' या प्रथमोपचार पद्धतीत संबंधित रुग्णाची छाती एका मिनिटाला 120 वेळा आणि ती पाच ते सहा सेमी खोल दाबावी लागते. त्याशिवाय तीस वेळा छाती प्रभावीपणे दाबल्यानंतर दोन वेळा कृत्रिम श्वास द्यावा लागतो. मात्र, न थकता या मंडळींनी प्रथमोपचार केले. पुढे दुसऱ्या खासगी दवाखान्यात नेल्यानंतर हा हृदयविकाराचा झटका नसून फुफ्फुसात रक्ताची गाठ अडकल्याने शुध्द रक्ताचा पुरवठा होत नसल्याचे निदान झाले आणि औषधोपचार करताच तो पूर्वपदावर आला. दरम्यान, कोल्हापूर भूलशास्त्र तज्ज्ञ संघटना "जीवन संजीवनी' प्रथमोपचाराबाबतचे प्रशिक्षण विनामूल्य देते. त्यामुळे आजवर तेवीस रुग्ण वाचले आहेत.
सात वर्षांपूर्वीची ती घटना म्हणजे माझा पुनर्जन्मच. त्यामुळे तो आता दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी सार्थकी लावायचे, असे ठरवले. गेली सहा वर्षे मी 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत आहे आणि अनेकांचे जीव वाचवल्याचे मोठे समाधान आहे.
- सचिन भोसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.