इचलकरंजी (रत्नागिरी) : शहरातील सुमारे 7 ते 8 हजार यंत्रमाग कारखानदार आता व्यापारी वर्गाकडून प्रलंबीत असलेल्या कोट्यावधी रूपयाच्या येणे बिलाच्या प्रतिक्षेत आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वी खर्चिवाले यंत्रमागधारक व अन्य यंत्रमागधारक यांनी उत्पादन करून दिलेल्या सुमारे महिन्याहून अधिक काळ कापड उत्पादनाचे बिल या यंत्रमागधारकांना मिळालेच नाही त्यामुळे हे यंत्रमागधारक आता मोठ्या संकटात सापडले आहेत.
दरम्यान कापड तयार करून घेणार्या अडत व्यापार्यांनी या खर्चिवाले यंत्रमागधारकांना देय बिलापोटी थोडीफार रक्कम देण्याची मागणी येथील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने अडत व्यापारी असोसिएशनकडे केली आहे.
यंत्रमागधारकांना कापडाची मजूरी मिळते
शहरात सुमारे सव्वालाख यंत्रमाग असून एकूण 13 हजार यंत्रमागधारक आहेत. यातील 30 टक्के यंत्रमागधारक हे खर्चिवाले आहेत. हे यंत्रमागधारक अडत व्यापार्यांच्याकडून सुताची बिमे घेऊन कापड तयार करून देतात. अडत व्यापार्यांच्याकडून या यंत्रमागधारकांना तयार केलेल्या कापडाची मजूरी मिळत असते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक अडत व्यापार्यांच्याकडून शहरातील या हजारो यंत्रमागधारकांना त्यांनी तयार केलेल्या कापडाच्या मजुरीची बिले मिळालीच नाहीत. परिणामी हे यंत्रमागधारक मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यांची आर्थिक उलाढाल थांबल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कामगारासह अन्य घटकांच्यावरही होत आहे.
यंत्रमागधारकांना अडव्हान्सपोटी कांही रक्कम द्यावी
खर्चिवाले यंत्रमागधारकांच्याबरोबरच शहरात 30 टक्के यंत्रमागधारक स्वत:च उत्पादन करून खरेदी विक्री करतात. अशा यंत्रमागधारकांचीही बिले प्रलंबीतच आहेत. त्यामुळे शहरातील सुमारे 7 ते 8 हजार यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडले आहेत.दरम्यान इचलकरंजीतील कापड व्यापारी व ट्रेडिंगधारकांनी कारखानदारांना कांही बिलांचे पेमेंट करावे व ट्रेडिंगधारकांनी यंत्रमागधारकांना अडव्हान्सपोटी कांही रक्कम द्यावी व स्वयंचलीत यंत्रमागधारकांची मजुरीची बिले द्यावीत, अशी मागणी आज अडते व ट्रेडिंग असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्याकडे करणेत आली.
यावेळी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, प्रकाश मोरे, विलास गाताडे, नगरसेवक सागर चाळके, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुडे, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, साधे यंत्रमाग संरक्षण समितीचे विश्वनाथ मेटे, ईस्लोचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत, दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे, संचालक रफिक खानापुरे, चंद्रकांत पाटील, नारायण दुरूगडे, दीपक राशिनकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.