राजर्षी छत्रपती शाहू महाराज दूरदृष्टीचे राजे. कला, क्रीडा,
शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही प्रेरक आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज शाहू विचारांचे कृतिशील पुरस्कर्ते व एक तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व. ‘केवळ हार, टिळा लावणारे भक्त नको, राजर्षी शाहूंच्या विचारांचे अनुयायी व्हा,’ असा संदेश ते देतात. आज (शुक्रवार) होत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
राजर्षी शाहूंनी जाती अंतासाठी लढा दिला. दुर्दैवाने पुन्हा जात व्यवस्था बळकट होऊन जाती-जातींत संघर्ष होताना दिसत आहे. काय सांगाल याविषयी?
- राजर्षी शाहूंच्या काळात जाती अंताच्या लढ्याची सुरुवात झाली. त्यातून बरेच आपण साधले. तो लढा मात्र अद्याप संपलेला नाही. तो पुढच्या काळातही सुरू ठेवावा लागेल. शिक्षणाने माणूस समृद्ध होत राहिला तर तो आपोआप जात सोडेल. राज्यकर्त्यांनी मतांच्या राजकारणासाठी जाती व्यवस्थेचा आधार घेऊ नये.
शाहूंचे विचार अभ्यासक्रमात आणण्याची गरज वाटते का?
- शाहूंचे विचार अभ्यासक्रमातून शिकवले जायला हवेत. मात्र, त्याची सुरुवात घरापासून व्हायला हवी. सामाजिक समतेचा संदेश देणारा गाभा शाहू विचारांत आहे. शाहू विचार शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले जावेत. सर्वच क्षेत्रांत शाहूंचे कार्य देदीप्यमान आहे. ते अभ्यासक्रमातून पुढे आल्यास विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण अधिक परिपक्व बनेल.
कुस्तीच्या गतवैभवासाठी काय करावे लागेल?
- शाहूंच्या काळात कुस्तीला ऊर्जितावस्था आली. गामा, इमामबक्ष, गुंगा या मल्लांनी इथल्या मातीत अंगचे गुण दाखवले. काळाच्या ओघात मातीत कुस्ती खेळणे कमीपणाचे वाटत आहे. विशेष प्रोत्साहन मिळत नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. कुस्ती खर्चिक खेळ असला तरी शासनाच्या प्रोत्साहनाखेरीज त्याला चांगले दिवस येणे अशक्य आहे.
राजकीय पक्षांकडून शाहू विचारांबाबत अपेक्षा काय आहे? - पक्ष कोणताही असो, तो शाहूंच्या विचाराच्या विरोधात आहे, असे म्हणणार नाही. कमी-जास्त प्रमाणात शाहूंच्या विचारांचे ते पालन करतात. कोणी मनापासून शाहू विचार आचरणात आणतो. कोणी कमी प्रमाणात तो डोक्यात घेतो. केवळ डिग्रीचा फरक आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी शाहूंच्या कृतिशीलतेचा वारसा जरी खांद्यावर वाहिला, तर महाराष्ट्राचा विकास
गतिमान होईल.
शाहूंचे भक्त वाढले. अनुयायी कमी झाले. याबाबत काय वाटते?
- शाहूंचे विचार समजून घ्यायला हवेत, तरच आपण अनुयायी होऊ. केवळ हार, टिळा लावून भक्त होण्यात काही साध्य नाही. त्यापुढे आपण गेले पाहिजे. शाहू विचार डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेऊन कार्यरत राहावे लागेल. अन्य देशांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. जी दूरदृष्टी शाहू महाराजांकडे होती, ती अनुयायी म्हणून पुढे आल्यास समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.
शाहूंच्या कार्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती व्हावी,
असे वाटते का?
- मित्र व्ही. बी. पाटील यांनी चित्रपटाबाबत आमच्याशी चर्चा केली आहे. शासनाचे प्रोत्साहन मिळाले तर चित्रपट काढणे शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.