कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहूया, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वत: भेटून केली. मात्र, या दोघांनीही दाद दिली नाही, भाजपने ही पोटनिवडणूक लादली असली तरीही, कोल्हापूर शहर हे भाजप धार्जिणे नाही’, हे दाखवण्याची वेळ आली आहे. जयश्री जाधव यांच्या माध्यमातून शहरातील पहिली महिला आमदार म्हणून विजयी होतील, आणि दिवंगत आमदार जाधव यांचे अधुरे कार्य पूर्ण करतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला.
उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ केशवराव भोसले नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी श्री. पाटील व मुश्रीफ बोलत होते. या वेळी, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुरेश साळोखे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘उत्तरची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतला, त्यावर ठामपणे काम करण्याची भूमिका सर्वांनीच घेतली होती. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांना घेऊन या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, त्यात ज्या पक्षाचा उमेदवार होता, त्याच पक्षाने ती निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला. कोरोनामध्ये अनेक नातेवाईक सोडून गेले. यात चंद्रकांत जाधव यांचाही समावेश आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांना दिलासा देण्याचे काम केले. पण, त्यांचे काम अपूर्ण राहिले, हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी जयश्री जाधव यांच्यावर आहे.
उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘राजकारणात यायचं नाही असेच ठरवले होते. पण लोकांचा विश्वास आणि प्रेम गप्प बसू देत नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी भावाप्रमाणे साथ दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भेटायला आले होते, त्यावेळी त्यांनी ‘तुम्ही भाजपच्या आहात भाजपमूधनच पोटनिवडणूक लढवा’, असे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी मन मोठे करायला हवे होते. पण तसे झाले नाही. चंद्रकांत जाधव यांनी हाती घेतलेला झेंडा अर्ध्यावर सोडायचा नाही म्हणून रिंगणात उतरल्याचेही त्यांनी सांगितले.
...तर मुख्यमंत्र्यांना कमीपणा येईल ः मुश्रीफ
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘सामान्यांना आधार देण्यासाठी कै. जाधव यांनी परिश्रम केले. पाच वर्ष ते काम करणार होते. त्यांना काम करता आले नाही. हे काम आता जयश्री जाधव पूर्ण करतील, त्यासाठी त्यांचे लाखो भाऊ त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आता जाधव यांना पाठबळ दिले आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. काही चुकीचे झाले तर त्याचा कमीपणा मुख्यमंत्र्यांना येऊ शकतो. भाजपने मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे.
डबे वाटणाऱ्यांना डब्यात घालणार :
प्लास्टिक, स्टिलचे डबे वाटणाऱ्यांना शहरवासीय डब्यात घालूनच पाठवतील. त्यामुळे कोण कितीही आमिष दाखवू देत त्याचा काहीही फरक पडणार नाही, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.