कोल्हापूर : इसवी सनाच्या आठव्या शतकापासून सुफी संतांच्या येण्या-जाण्याने कोल्हापूरला इस्लाम धर्माचा परिचय झाला होता. त्यानंतरच्या मुस्लिम राजवटीमध्ये काही दर्गे बांधण्यात आले. धार्मिक सलोखा कायम राखून समाज गुण्यागोविंदाने नांदतो, याचा वास्तुरुपात उदाहरण असणारा वारसा म्हणजे बाबूजमाल दर्गा असे म्हणणे गैर ठरणार नाही. अंबाबाई मंदिरापासून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना ५०० मीटर अंतरावर हा दर्गा आहे.
१३४७ ते १४९० या बहामनीच्या काळात बांधकाम झाले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्याला भक्कम आधार नाही.
शहराला तटबंदी असताना गायकवाडांची नारळाची बाग व खंबाळा तलाव (प्रल्हाद तीर्थ) होता. त्यामागे हा दर्गा आहे. यासाठीचे नगारखाना प्रवेशद्वार पूर्वेकडून असून, त्याची उभारणी १९०९ मध्ये हजार रुपये खर्च करून गुनिजन वनुजॉ खडकवले नायकिनीच्या स्मृतीसाठी तिच्या आई व भावांनी केलेली दिसते.
डाव्या बाजूला सभागृह आणि उजव्या बाजूला छत्रपती शाहूंच्या नावाने आखाडा व सभागृहाची दोन मजली इमारत बाहेरून जिना असलेली आहे.
हेही वाचा - ‘कोव्हॅक्सिन’चा तिसरा टप्पा कोल्हापुरात ; अंतिम निर्णय मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर -
सभागृहात पीर व गणपती अनेकदा एकत्र बसविण्याची जुनी परंपरा आहे. त्यापुढे मोकळे पटांगण असून, त्यामध्ये विहीर आणि गर्द झाडांनी व्यापलेला भाग आहे. इतर छोट्या इमारती आहेत. मध्यभागी मोठा गोल घुमट असून, त्याच्या चारही कोपऱ्यांवर पुन्हा चार लहान घुमट आहेत. कमी उंचीच्या चौकटीवर हिंदू मंदिराप्रमाणे गणेशपट्टी आहे. त्या गणपतीची पूजा नियमित केली जाते. चौकटीतून आत प्रवेश केल्यावर मध्यभागी मोठी मजार (तुरबत) हजरत पीर शहाजमाल कलंदर यांची असून, उजव्या कोपऱ्यात आणखी एक छोटी मजार बाबू यांची आहे.
उजव्या बाजूला म्हणजेच पूर्वेला मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने एक दरवाजा आहे. दर्ग्याच्या छताची रचना मुघल शैलीतील असली तरी अलीकडे काचेच्या आरशांची सजावट केली आहे. पश्चिम भिंतीमधील उभ्या देवळीत सतत तेवणारी समई आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये दोन देवळ्या असून, त्यामध्ये धर्म ग्रंथ आणि मध्यभागी पंजे याची निशाण आहे. त्याच्या पश्चिमेला आणखी एक वास्तू आहे. या परिसरात आणखी दोन मजार मशिदीमध्ये आहेत. तसेच पिछाडीस रंग अली शहाबाबा यांची मजार आहे. त्याच्या बाजूला जलाली फकीर तकिया (बैठक) आहे. बेबी फातिमा यांचा पंजा सोपा (खोली) आहे. तिथे मोहरममध्ये पाच पीर बसवले जातात. शेजारी कंदील वाले बाबा यांचा दर्गा आहे. बोडके बाबा, दर्ग्याचे खादिम (पुजारी) काझी व मुजावर यांच्या मजार आहेत.
छत्रपती शाहू महाराज लवाजम्याने दर्ग्यात आल्याची आठवण आहे. उरुसाला हत्ती, घोडे, उंट असा लवाजमा छत्रपतींकडून येत असे. आजही उरुसाला गलेफ भवानी मंडपातील छत्रपतींच्या तख्तावर ठेवला जातो. सुफी संत शहाजमाल कलंदर यांच्या दर्ग्याची मन्नत (नवस) आदिल शहाने मागितली होती. तेराव्या शतकात पीर शहाजमाल कलंदर यांचे एकमेव शिष्य मुरिद लाल शबाज कलंदर हे होते. त्यांचा दर्गा पाकिस्तानात सेहवान शरीफ सिंध या ठिकाणी आहे.
उकळत्या तेल कढईमध्ये लाल हे कलंदर यांच्या आदेशाने उतरले, त्यांच्या या कामगिरीने तो लकब प्राप्त झाला, अशी घटना सांगितली जाते. त्यांना जी पदवी प्राप्त झाली ती या दर्ग्यामध्ये देण्यात आली. पंचधातूची कढई आजही दर्ग्यात आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी सिंध व पाकिस्तानमधून पठाण लोक येतात. एका प्रसिद्ध सुफी भजनाशी कोल्हापूरमधील ही वास्तू अशी जोडली आहे, हाही एक वारसा असावा; मात्र त्याचे अचूक संदर्भ मिळत नाहीत. शहरातील इतर दर्गा, मशीद यांच्यासह या वास्तुमध्ये सिरॅमिक टाईल्स, ऑईल पेंट, अनावश्यक बांधकाम असे झालेले बदल टाळून त्यांचा वारसा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आवर्जून केल्यास इथल्या संस्कृतीशी जोडलेली त्यांची नाळ कायम राहील.
गुरू-शिष्यांची स्मृती दर्ग्याच्या रूपात कायम
हजरत पीर शहाजमाल कलंदर नामक एका संतांच्या वास्तव्यादरम्यान बाबूने सातत्याने सेवा केली. आपल्या नावाआधी तुझा उल्लेख होईल, हे संत वचन पाळल्याने गुरू-शिष्यांची स्मृती या दर्ग्याच्या रूपात कायम झाली आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.