Kolhapur in Mauritius!
Kolhapur in Mauritius! 
कोल्हापूर

मॉरिशसमधील कोल्हापूर! 

यशोधन जोशी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोल्हापूर सोडून बाहेर फारसे रमत नाहीत, कुठेही असले तरी त्यांच्या मनात कोल्हापूर सदैव रुंजी घालत असते; पण दोनशे वर्षांपूर्वी कोल्हापूरची काही मंडळी कोल्हापूर सोडून बाहेर पडली आणि लांब समुद्रापार जाऊन पोचली. हिंदी महासागरात आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मॉरिशस हा छोटासा बेटवजा देश आहे. भारताप्रमाणे इथंही ब्रिटिशांचं राज्य होतं. मॉरिशसमधलं हवामान आणि जमीन यांचा अभ्यास करून या इथं ऊसाची लागवड करुन त्यातून फायदा मिळवता येईल हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच त्याची अंमलबजावणी सुरू केली; पण लवकरच या ऊसाच्या शेतात काम करायला मनुष्यबळ कमी पडायला लागले. मग यावर उपाय म्हणून ब्रिटिशांच्या इतर वसाहतीतून तिकडं मजूर न्यायला परवानगी देण्यात आली. 
याचा परिणाम म्हणून भारतातूनही अनेक मजूर मॉरिशसला गेले. मजूर भरती करून घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने नेमलेले एजंट महाराष्ट्रातही गावोगावी फिरून मॉरिशसला जाण्यासाठी मजुरांची भरती करू लागले. 1834 मध्ये मराठी लोकांनी भरलेलं पहिलं जहाज मॉरिशसच्या किनाऱ्याला लागलं. यात सातारा, सांगली आणि कोकणबरोबर कोल्हापूर प्रांतातलेही अनेक लोक होते. 
एक मतप्रवाह असाही आहे की, कोल्हापूर, सातारा प्रांतातले 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेले आणि नंतर भूमिगत झालेले अनेक क्रांतिकारकही शिक्षेपासून बचाव व्हावा मॉरिशसला गेले. सुरुवातीला गेलेल्या लोकांची माहिती फारशी मिळत नसली तरी पुढच्या काळात हळूहळू मॉरिशसमध्ये दाखल होणाऱ्या मंडळींची नोंदणी होऊ लागली. ज्यात त्यांचे नाव, वय, गाव आणि जिल्हा किंवा इलाखा अशा गोष्टींची नोंद होऊ लागली. 1860 मध्ये मुंबईतून अली रहमान नावाच्या जहाजाने मॉरिशसला गेलेल्या प्रवाशांची यादी मला सापडली आणि ती वाचताना माझ्या लक्षात आलं की, कोल्हापूरचे आणि आसपासच्या अनेक गावातले लोक त्या यादीत आहेत. यात म्हाळुंग्याचा कुणी दाजी भानू आहे, केरलेचे भैरू, हरी आणि रामजी शिंदे हे तिघे भाऊ आहेत. पन्हाळ्यातला पिराजी आहे, कोल्हापुरातले नाना आणि आप्पाजी आहेत. साधारणतः अशी 60 कोल्हापुरकरांची नावं या यादीत सापडतात. हे सगळे जवळपास 20 ते 30 वर्षांचे आहेत. महिन्याला 5 रूपये पगारावर पाच सात वर्षांसाठी दूरदेशी गेलेली. ही मंडळी हळूहळू तिथंच स्थायिक झाली, मजुरी करत करत त्यांनी तिथं स्वतःच्या जमीनी विकत घेतल्या आणि उत्तम कुणबावा करू लागले. 
अनेकांनी आपला कुटुंबकबिलाही सोबत नेलेला होता. त्यांच्या पुढच्या पिढ्या मॉरिशसमध्येच जन्मल्या आणि वाढल्या. 1840 मध्ये कोल्हापुरातून मॉरिशसला गेलेल्या सुखदेव राघू चव्हाण आणि बापू रखमाजी यांच्या तिकडं वाढलेल्या कुटुंबाच्या वंशावळीही मला बघता आल्या. त्या काळात संपर्काची साधनं नसल्यानं त्यांचा आपल्या भारतातल्या गोतावळ्याशी पुढं कधीच संपर्क आला नाही. 
मॉरिशसमध्ये आजही सुमारे 25000 मराठी लोक आहेत. त्यांनी मराठी संस्कृती अजूनही टिकवून ठेवलेली आहे. गणपती, नवरात्र, दिवाळी, सत्यनारायण, हरिपाठ या गोष्टी ते अजूनही करतात. लग्नानंतरचा देवीचा गोंधळ, करमणुकीसाठी लावणी आणि कवनं हेही या मराठी लोकांनी जपलेलं आहे. जवळपास दोनशे वर्षांपूर्वी या मंडळींनी स्वतःबरोबर नेलेली भांडी, दळायचं जातं अशा गोष्टी आजही अनेक कुटुंबात अजूनही सांभाळून ठेवलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठी माणसाचा अभिमान असलेली शिवजयंती मॉरिशसमध्येही साजरी होत असते. 


कौतुक करावं तेवढं थोडंच 
पोटापाण्यासाठी आपलं गाव आपला देश सोडून गेलेल्या या साध्या लोकांना सातासमुद्रापार पोचल्यावर कधीतरी पंचगंगा आठवली असेल, अंबाबाईचं देऊळ आठवलं असेल आणि जोतीबाच्या यात्रेत उधळलेला गुलालही आठवला असेल. आपल्या लेकराबाळांना त्यांनी आपल्या गावच्या, कोल्हापूरच्या गोष्टीही सांगितल्या असतील. आपलं गाव सोडून कधी फारसं बाहेर न पडलेल्या पण नवीन देशात जाऊन अथक कष्टानं आणि जिद्दीनं आपला ठसा उमटवणाऱ्या या कोल्हापूरकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT