जयसिंगपूर, : सोलापूरहून शहरात आलेल्या वीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. गुरुवारी त्याचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सायंकाळी पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. लागण झालेल्या तरुणासह त्याच्या कुटुंबीना कोरोना कक्षात हलविण्याच्या तसेच शहरातील नांदणी रोडवरील संभाजीनगर परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
दरम्यान, पालिकेच्या वतीनेही खबरदारीचे कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या तरुणाला रविवारी (ता. 10) इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला. या ठिकाणी दोन दिवस त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले. मंगळवारपर्यंत तो रुग्णालयात होता. यानंतर त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह तर सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरू आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जयसिंगपूर आणि शिरोळची आरोग्य यंत्रणा बराच काळ अनभिज्ञ होती. रात्री पालिका प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात पुरेशा प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत.
नगरसेवक, आरोग्य विभागाच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगसह गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले होते. तर पोलिसांनीही वाहनधारकांवर कारवाईतून मार्गावरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. प्रभाग समितीच्या माध्यमातून या उपाययोजना राबविल्या जात होत्या. गुरुवारी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातून जयसिंगपूरपर्यंत कोरोना रुग्णाने जयसिंगपूरमधील एका महिला डॉक्टरच्या कारमधून प्रवास केला. हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित महिला कोण याची शहरात चर्चा सुरू झालीच शिवाय आरोग्य यंत्रणेकडूनही माहिती घेण्याचे काम सुरू झाले.
संभाजीपूर नव्हे संभाजीनगर
गुरुवारी सायंकाळी संभाजीपूरमध्ये रुग्ण सापडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, जयसिंगपूरमधील नांदणी रोडवरील संभाजीनगरमधील तरुणाला कोरोना झाल्यानंतर पालिका प्रशासनासह परिसरातील नागरिकांची भंबेरी उडाली.
शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर पालिकेच्या वतीने प्रभावी उपाययोजनांसाठी बैठक घेतली. यात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाची व्याप्ती वाढणार नाही याची पुरेशी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.
-राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.