कोल्हापूर : नवे वर्ष येऊ घातले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही प्लॅनही बनवले आहेत. तर काहींनी सहकुटुंबासोबतच नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे निश्चित केले आहे;
परंतु मुळातच एकत्र राहणाऱ्या कुटुंबांनीही नव्या वर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही सहकुटुंबच करण्याचा घाट घातला आहे.
फक्त वर्षाच्या शेवटी एकत्र येऊन तो दिवस साजरा करण्यासाठी नव्हे, तर वर्षातील प्रत्येक दिवस सहकुटुंब साजरा करण्याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे.हलसवडे (ता. करवीर) येथील खोचगे कुटुंब गेले तीन पिढ्यांपासून एकत्रित राहत आहे.
आजोबा अप्पू खोचगे यांनी पत्नी साताबाई यांच्यासोबत संसाराची सुरुवात केली. त्यांना राऊसो, भाऊसो आणि दादासो ही तीन मुले. त्यांनीही एकत्र कुटुंबात राहत एकत्रित कुटुंबपद्धतीचा स्वीकार केला. या तीन भावंडांना चार मुले व दोन मुली.
मोहन, अरुण, चेतन व किशोरकुमार ही मुलांची नावे. यांचे विवाह झाल्यानंतरही एकत्रित कुटुंब कायम राहिले. या सर्वांची मिळून नऊ अपत्ये. असे एकूण २५ जणांचे कुटुंबीय अगदी गुण्यागोंविदाने राहते आहे. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, मात्र चूल एकच. त्यामुळे घरातील कोणतेही छोटे-मोठे काम हातासरशी होते.
घरातील महिलांचाही चांगला ताळमेळ बसला आहे. कामे वाटून घेताना प्रत्येकाच्या कौशल्याचा विचार करून ते काम उत्कृष्ट कसे होईल, याचा विचार केला जातो. एका वेळी ३० भाकरी, चपात्या, तीन - चार पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात.
जेणेकरून प्रत्येक सदस्य आपल्या आवडीनुसार आहाराचा आस्वाद घेईल. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागतही सहकुटुंब करतो. त्याप्रमाणेच कोजागिरी पौर्णिमेची रात्रही सहकुटुंबच साजरे करतो, असे मोहन खोचगे यांनी सांगितले.
फुलेवाडी येथील लाड कुटुंबीयही अशाच पद्धतीने नववर्षाचे स्वागत करतात. हे कुटुंबीय चार पिढ्यांपासून एकत्र आहे. घरात ३४ सदस्य. त्यामुळे कोणताही सण सहकुटुंबच साजरा होतो. विशेषतः होळी पौर्णिमा, बैलपोळा, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांना तर हमखास सहकुटुंबाची मैफल रंगते.
आमचे गुऱ्हाळघर असल्याने तिथेच ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन होते. तसेच विविध सण-समारंभही एकत्रितच साजरे होतात. आम्ही फक्त सणांसाठी एकत्र येत नाही, तर प्रत्येक सण सहकुटुंब साजरा करत त्याचा आनंद द्विगुणित करत आहोत.
- विजय लाड, फुलेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.