कोल्हापूर, : नवरात्रोत्सव आता केवळ तीन दिवसांवर आला असून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
देवीचे चांदीचे अलंकार आणि पुजेच्या साहित्याची स्वच्छता आज पूर्ण झाली. उद्या (बुधवारी) देवीच्या हिरे, माणिक, पाचू आदी जडावांच्या अलंकारांची स्वच्छता होणार आहे. दरम्यान, यंदा उत्सव भाविकांविना साध्या पध्दतीने होणार असला तरी उत्सवातील मांगल्य आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
अष्टमीदिवशीचे देवीचे चांदीचे वाहन, सिंहासन, कटांजन, पंचारती, एकारती, धूपारती, उत्सवमूर्तीची प्रभावळ, पताका, चोपदार काठी, अब्दागिरी, त्रिशूळ, तलवार आदी साहित्याची स्वच्छता झाली.
यावेळी समिती सदस्य राजू जाधव, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, कपीलतीर्थ मार्केट येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्रही उत्सव काळात बंदच राहणार आहे. मात्र, ट्रस्टच्या वतीने कार्यालयात नऊ दिवस नऊ विविध रूपातील पूजा बांधल्या जाणार आहेत.
चारही गेटवर पोलिस
उत्सवकाळात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, चारही प्रमुख दरवाजातून दर्शन घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात चारही प्रमुख गेटवर पोलिसांचा बंदोबस्त असेल. येथे भाविकांची अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी देवस्थान समितीतर्फे घेतली जाणार आहे.
दहा हजारांवर कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेलीच
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने गेली सहा महिने या परिसरातील विक्रेते, फेरीवाल्यांचे अर्थकारण कोलमडलेलेच आहे. नवरात्रोत्सवातही मंदिर बंदच राहणार असून या परिसरातील आठ ते दहा हजारांवर कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शहराच्या मध्यवस्तीत मंदिराच्या चारही बाजूंनी रोजगाराचं महाजाळं तयार झाले आहे. त्यामुळे या परिसरावर अवलंबून असणारी आठ ते दहा हजारांवर कुटुंबं बेरोजगार बनली आहेत. कुणी फेरीवाला, कुणी खाद्यपदार्थ विकणारा, कुणी हारवाला, कुणी फुलवाला तर कुणी खेळणीवाला. जोतिबा रोड, महाव्दार रोड, ऐतिहासिक भवानी मंडप, विद्यापीठ हायस्कूलपासून पुढे बिनखांबी आणि मिरजकर तिकटी असो किंवा गुजरी आणि पुढे चप्पल लाईनपर्यंत हजारो विक्रेत्यांचा या परिसर आधार आहे. अपंग व अंधांसाठी तर हा परिसर पुनर्वसन केंद्रच ठरला आहे. दर्शनरांगेत हार आणि वेणी विकणाऱ्या विक्रेत्यांचीच संख्या तीसहून अधिक आहे. मात्र, दर्शनच बंद असल्याने या मंडळींनीही मंदिराकडे पाठ फिरवली आहे. हार-फुले विकणाऱ्यांची संख्या पन्नासहून अधिक असून त्यांच्याकडेही अगदी तुरळक गर्दी आहे.
अर्थकारणाला ब्रेक
मंदिराच्या चारही बाजूंनी पहाटेपासून सकाळी दहापर्यंत आणि सायंकाळी सहानंतर मिसळ, आप्पे, इडली, सॅंडविच, थालिपीठ, आंबोळी अशा विविध पदार्थांचे स्टॉलही वाढले आहेत. नवरात्रोत्सव काळात या व्यावसायिकांची मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा मंदिरच दर्शनासाठी बंद राहणार असल्याने परगावाहून भाविकही येणार नाहीत. त्यामुळे एकूणच या परिसरातील अर्थकारणाला ब्रेक लागणार आहे.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.