कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची मतदार नोंदणी गुरुवारी (ता. ५) संपली. यात कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक म्हणजे ८७,९५८ आहे. पाठोपाठ पुणे, सांगली जिल्ह्यांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांकडून तिकिटासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पुण्याचे राजेश पांडे यांचे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड (कुंडल, जि. सांगली) यांचे नाव आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांचा निर्णय अद्याप झाला नसला तरी प्रमुख लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार असे चित्र आहे.
पदवीधर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील अल्पमतांनी विजयी झाले. त्यांना ६१ हजार मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची ५९ हजार मते मिळाली. अपक्ष निवडणूक लढवलेल्या अरुण लाड यांनी तुल्यबळ लढत देत ३२,७०० मते घेतली. या वर्षीच्या निवडणुकीत मात्र चंद्रकांत पाटील व सारंग पाटील दोघेही रिंगणात नाहीत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून राजेश पांडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र कोल्हापूरची नोंदणी सर्वाधिक असल्याने माणिक पाटील (चुयेकर) यांना उमेदवारी मिळते का? याची उत्सुकता स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अरुण लाड यांना मिळेल अशी चर्चा आहे; मात्र शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर असणारे भैय्या माने हे देखील पदवीधरसाठी इच्छुक असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव उचलून धरले आहे.
मतदानासाठी २४ दिवसच उमेदवारांना मिळणार असून त्यातही दिवाळीच्या चार दिवस प्रचारात व्यतय आणणार आहेत. भाजपचा पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळवणार का? की भाजप विजयाची हॅट्ट्रिक करणार हे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यावरच कळू शकेल.
मुश्रीफांकडे उमेदवारीची मागणी
जिल्हा परिषद सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने कागलचे भैय्या माने यांना उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यंना निवेदन दिले. शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, हंबीरराव पाटील, उमेश आपटे, युवराज पाटील, प्रवीण यादव, राजेश पाटील यांचा समावेश होता.
जिल्हानिहाय मतदार नोंदणी
कोल्हापूर ८७,९५८
सांगली ८५,८२७
पुणे ८५.६१९
सातारा ५६,१२६
सोलापूर ४८,९१९
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.