कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा उद्या (ता. ६) पारंपरिक उत्साहात होणार आहे. देवस्थान समितीने तयार केलेल्या नवीन सागवानी लाकडी रथातून पहिल्यांदाच हा सोहळा सजेल.
या रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झाले नसले तरी रथावरील ५० मीटर प्रोफाईल एलईडी दिवे आणि २२ स्पॉटलाईट्सचा झमगमगाट अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, देवस्थान समिती आणि श्रीपूजक मंडळातर्फे आज नवीन रथाचे पूजन व त्यानिमित्त विविध धार्मिक विधी झाले.
आकर्षक रांगोळ्या अन् शिवकाळही अवतरणार
चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा होतो. या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून रात्री नऊला सोहळ्याला प्रारंभ होईल. यावेळी महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसादाचे वाटप होईल. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे संपूर्ण गुजरी आणि महाद्वार मार्ग व्हाईट मेटल लाईटस्नी उजळणार आहे.
त्याशिवाय कोल्हापूरसह मुंबई आणि मुंबईच्या रंगावलीकारांचा रांगोळीचा आविष्कार सजणार आहे तर अडीच हजार किलो प्रसादाचेही वितरण होणार आहे. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने यंदा रथाचे अनोख्या पध्दतीने स्वागत होणार आहे. बालगोपाल तालीम चौकात रात्री दहाला वैशिष्ट्यूपूर्ण पद्धतीने शिवकाळ अवतरणार आहे.
पोलिसांचे आवाहन
यंदा या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांनी मोबाईल, पैशाची पाकिटे व दागिने परिधान करून गर्दीत येवू नये.
लहान मुलांना गर्दीपासून लांब ठेवावे, रथोत्सव मार्गावर वाहनांचे पार्किंग करू नये, असे आवाहन जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांनी केले आहे. दोन्ही बाजूंनी भाविकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, अशा पध्दतीने रंगावली व फुलांची सजावट करणाऱ्या कलाकारांनी मोजक्याच जागेत कलाविष्कार सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
रथावरील रोषणाई अशी...
रथावरील नक्षीदार चांदीचे पत्रे अद्यापही लावलेले नाहीत. मात्र, सध्या आहे त्या स्थितीत रथावर १२ वॉट बॅटरीवर चालणाऱ्या तब्बल ५० मीटर प्रोफाईल एलईडी दिव्यांचा झगमगाट असेल. तीन वॉटचे २२ स्पॉटलाईट्स आहेत.
चांदीचे पत्रे लावल्यावरही ही व्यवस्था कायमस्वरूपी ठेवता येईल. त्याशिवाय, पुन्हा काढून पुन्हा जोडता येईल, अशा पद्धतीने त्याचे पेस्टिंग केले असून, त्यासाठी बाहेरील चार वायरमन्सचीही मदत घेतल्याचे प्रशांत आंबेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.