गडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटीने मालवाहतुकीतून उत्पन्नाचा नवा स्त्रोत शोधला. सुरवातीच्या टप्प्यात त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, येथील आगाराने व्यापारी आणि उद्योजकांशी थेट संपर्क साधत मालवाहतुकीच्या एसटीला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या दीड महिन्यात तीन लाखांची कमाई केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या एसटीला ही मालवाहतूक आधार ठरण्याची चिन्हे आहेत.
एसटी सुरू झाली तरी गर्दीत कोरोनाची शक्यता धरून प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे सतत गजबजलेल्या बस स्थानाकाला एकेक प्रवाशाची वाट पाहण्याची वेळ आली आहे.
ेएसटी सुरू झाली असली तरी फेऱ्या जेमतेमच आहेत. त्यातही बसमध्ये एका बाकड्यावर एकच प्रवाशाला सवलत दिली असल्याने निम्म्या उत्पन्नावर फेरी करावी लागते. मालवाहतूक म्हणजे ट्रक, टेम्पो अशीच वर्षानुवर्षाची ओळख. साहजिकच प्रवासी वाहतुकीसाठी प्रसिद्ध असणारी एसटी मालवाहतूक कशी करणार, याची केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही कोडे होते. मालवाहतुकीसाठी एसटीची रचना बदलण्यात आली. बाकडी काढून अधिक जागा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक आगाराला दोन मालवाहतूक बस देण्यात आल्या.
मेअखेरीस मालवाहतूकचे धोरण ठरले असले तरी सुरवातीला व्यापारी, उद्योजकांची मानसिकता नव्हती. प्रवाशांच्या सोयीसाठी अविरत धावणारी एसटी अडचणीत असून, सहकार्याची गरज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटून पटवून दिली. त्याचाच परिणाम मालवाहतुकीला प्रतिसाद वाढल्याचे आगारप्रमुख सौ. एस. एस. मनगुतकर यांनी सांगितले. सांगली, इस्लामपूर, जयसिंगपूर, चिपरी, कागल या ठिकाणी मालवाहतूक केली आहे. यातून दीड महिन्यात तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. किलोमीटरला 38 रुपये तर एका फेरीला किमान 3500 रुपये भाडे आकारले जात आहे.
फेऱ्या पुन्हा कमी
मुळातच कोरोनामुळे फेऱ्या कमी होत्या, तरीही येथील आगाराच्या सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग असणाऱ्या कोल्हापूर फेरीला जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यातही गडहिंग्लज शहरात वीसहून अधिक रुग्ण झाल्याने फेऱ्या घटल्या आहेत. आजरा, हिटणी, नेसरी या मार्गावर फेऱ्या सुरू आहेत.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.