गैरव्यवहारांवरून जोरदार खडाजंगी
चंदगड पंचायत समिती सभा ः मिशन, आरोग्य व ग्रामपंचायत, शिक्षणवर संशयाची छाया
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ८ : विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशनमधील कथित गैरव्यवहार, माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन वर्षे गैरहजर राहून उचललेला ५४ लाखांचा पगार, तसेच कोवाड ग्रामपंचायतीतील कचरा कुंडी खरेदीतील संशयास्पद खर्च या मुद्द्यांवरून पंचायत समितीच्या नूतन सदस्य मंडळाची पहिली मासिक सभा चांगलीच गाजली. सभापती विलास नाईक अध्यक्षस्थानी होते. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी प्रारंभी स्वागत करून विषयांना सुरुवात केली. विकसित भारत मिशनचा आढावा देताना सचिन गुरव यांना विरोधी गटनेते रवींद्र बांदिवडेकर यांनी धारेवर धरले. कागदोपत्री घोडे नाचवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत स्वतंत्र चौकशी समितीची मागणी त्यांनी केली. यावर सभापती नाईक यांनी यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे सांगितले.
कोवाड ग्रामपंचायतीत कचरा कुंड्यांसाठी १.६८ लाख रुपये खर्च दाखवूनही प्रत्यक्ष खरेदीच केली नसल्याचा आरोप बांदिवडेकर व सुवर्णा कुंभार यांनी केला. तसेच पाच वर्षांत चार ग्रामसेवक बदलल्याने प्रशासनात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले.
शिक्षण विभागात शाळा गुणवत्ता मूल्यांकनामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचा प्रश्न सभापती नाईक यांनी उपस्थित केला. गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी हे केवळ मूल्यांकन असल्याचे स्पष्ट केले. काही शिक्षकांनी पगारी शिक्षक नेमल्याच्या आरोपावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
जनजीवन मिशनअंतर्गत महिपाळगड व कोवाड येथील पाण्याच्या टाकी बांधकामातील त्रुटींवरही चर्चा झाली. निकृष्ट कामांबाबत स्ट्रक्चरल ऑडिटनंतर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. रखडलेल्या कामांची व टंचाईग्रस्त गावांची यादी दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
..................
चौकट
दृष्टिक्षेपात...
विकसित भारत मिशनमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी समिती स्थापन
माणगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन वर्षे गैरहजर; अहवालाची मागणी
कोवाड ग्रामपंचायतीतील कचरा कुंडी खर्चावर संशय
शिक्षण विभागातील अतिरिक्त कामावरून नाराजी
पाणीटाकी बांधकाम निकृष्ट; स्ट्रक्चरल ऑडिटनंतर निर्णय
.................
चौकट...
तीन वर्षे गैरहजर, तरीही पगार उचलला
आरोग्य विभागाच्या आढाव्यावेळी बांदिवडेकर यांनी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने तब्बल तीन वर्षे गैरहजर राहूनही ५४ लाखांचा पगार उचलल्याकडे लक्ष वेधले. त्याच्यावर काय कारवाई झाली अशी विचारणा केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी त्यांची वरिष्ठांनी चौकशी केली असल्याचे सांगितले. मात्र, हा अधिकारी त्याच जागेवर पुन्हा कार्यरत असेल तर कारवाईला अर्थ काय, अशी विचारणा बांदिवडेकर यांनी केली. कारवाईचा अहवाल मिळावा, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.