सेवा सदनची जाहिरात बातमी फोटोसह घ्यावी....
36292
गडहिंग्लज ः जागतिक आरोग्य दिनी सेवासदन स्कूल ऑफ नर्सिंगतर्फे शहरातून आरोग्य प्रबोधन फेरी काढण्यात आली. त्यात विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘सेवा सदन’तर्फे आरोग्यदिनी प्रबोधन फेरी
गडहिंग्लज : जागतिक आरोग्य दिनानिमित्त येथील सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्याव तीने शहरात जनजागृतीपर प्रबोधन फेरी काढली. या फेरीद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फेरीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करत असून, त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने आरोग्यविषयक सवयी अंगीकारून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही सांगण्यात आले. प्राचार्य विनोद बागीलकर यांनी मार्गदर्शन केले. प्रबोधन फेरीमुळे शहरात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
..........................
अडकूरला सोमवारी ‘विराट हिंदू संमेलन’
चंदगड ः अडकूर येथे सोमवारी (ता. १३) ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित केले आहे. हिंदू धर्म, परंपरा व संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सायंकाळी ५.३० वाजता श्री रवळनाथ मंदिराच्या पटांगणात कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक ते मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिवाजीराव मोरे प्रमुख उपस्थित राहणार असून, युवराज कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे..
..........................
बेळगाव-वेंगुर्ला रस्ताप्रश्नी आज शिनोळीत रास्ता रोको
चंदगड : बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शिनोळी (ता. चंदगड) येथे स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या वतीने उद्या ( ता. १०) सकाळी दहा वाजता गणपती मंदिर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर डॉ. एन. टी. मुरकुटे, डॉ. प्रशांत कदम, डॉ. निवृत्ती गुरव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
....................
हलकर्णी महाविद्यालयात गुणवत्ता वाढ उपक्रम
चंदगड : महाराष्ट्र शासनाच्या ‘परिस स्पर्श’ योजनेंतर्गत उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने विविध मार्गदर्शक उपक्रम राबविले. शिवाजी विद्यापीठाने नॅक ‘ए’ मानांकनप्राप्त या महाविद्यालयाची निवड करून मेंटी महाविद्यालयांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी पुढाकार घेतला. ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागत परुळेकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. टी. एम. चौगुले, आदींनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. डॉ. राजेश घोरपडे, प्रा. डॉ. ज्योती व्हटकर, प्रा. पी. ए. पाटील यांनी नॅक तयारीबाबत प्रशिक्षण दिले.
.......................
जरळीत ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात
नूल ः जरळी (ता. गडहिंग्लज) येथे अखंड हरिनाम सप्ताह व संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी अनिल कुलकर्णी यांच्या घरातून विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरात आणल्यानंतर तेथे मूर्तिपूजन झाले. दररोज पहाटे हरिपाठ व काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण गाथा, भजन कीर्तन असे कार्यक्रम सुरू आहेत. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सद्गुरू होनमोरे महाराजांचे कीर्तन सुरू आहे. मंगळवारी (ता. १४) होनमोरे महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने व दुपारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
.........................
गॅसपुरवठ्याची मनवाडकरांची मागणी
गडहिंग्लज : बुकिंग करूनही गॅस सिलिंडर वेळत मिळत नसल्याची तक्रार मनवाड (ता. गडहिंग्लज) येथील ग्राहकांनी केली आहे. गॅसपुरवठा सुरळीत करून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे. येथील तहसीलदारांना याबाबतचे निवेदन दिले आहे. आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुडवडा जाणवत आहे. बुकिंग केल्यानंतर २० त २५ दिवसांनी सिलिंडर मिळत आहे. ग्राहकांना पूर्वसूचना न देता एका एजन्सीकडून दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग केले. आता पुन्हा पहिल्याच एजन्सीकडे ग्राहकांना वर्ग केले आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. सरपंच पांडुरंग लोखंडे, ज्ञानप्रकाश रेडेकर, केदारी आसवले, सुनीता देसाई आदींनी हे निवेदन दिले.
..................