01906
राई (ता. राधानगरी) : येथील धामणी प्रकल्पाच्या घळभरणी प्रारंभप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
...
आमचे सरकार जनतेचे, गरिबांचे सरकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : धामणी मध्यम प्रकल्पाचा घळभरणी प्रारंभ
धामोड, ता. ९ : ‘आमचे सरकार हे जनतेचे, गरिबांचे सरकार आहे. महाआघाडीचे अडीच वर्षांचे काम आणि महायुतीचे दोन वर्षांचे काम याबाबत जनतेच्या दरबारात फैसला होऊन जाऊ दे,’ असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राधानगरी तालुक्यातील राई येथे धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , ‘आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले हे जनतेला माहिती आहे. आम्ही मात्र दोन वर्षांत मिळालेल्या संधीचे सोने केले. लाडकी बहीण, लाडका भाऊ कौशल्य विकास, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, शेतीपंपांसाठी वीजमाफी, आदी अनेक योजना राबविल्या. दिवसातून १८ तास मी जनतेसाठी काम करतो. मी जनतेचा सेवक आहे. कोल्हापूरच्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले. आमदार आबिटकरसारखा मला चांगला सहकारी लाभला. हा एक कामसू आणि धडपड्या नेता, कार्यकर्ता आहे. ’
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवूनच विकासाची वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम पूर्णत्वाला जात आहे, हा शुभ संकेत आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने हा माझ्यासाठी पुण्याईचा क्षण आहे.’
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाळासो नवणे, रोहित बांदिवडेकर, एस. एन. पाटील, विलास बोगरे, दिनकर पाटील, आदी उपस्थित होते. आभार नंदकुमार निर्मळे यांनी मानले.
...
आमदार आबिटकरांना मंत्री करू
‘आमचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे आमदार आबिटकर यांना मंत्री करता आले नाही. आता ही संधी लवकरच मिळेल. आम्ही तो शब्द पाळू,’ असे वचनही मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.