स्पर्धांच्या नियोजनाअभावी नवोदितांची ओढाताण
मैदानी व क्रिकेट स्पर्धा एकाचवेळी ः पाणी, निवाऱ्याअभावी खेळाडूंची गैरसोय; कामगिरीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : यावर्षी लागोपाठ शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडू पुरते दमले आहेत. अशातच आज येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलात मैदानी आणि क्रिकेट असे दोन क्रीडा प्रकार एकाच दिवशी घेतल्याने नवोदितांची ओढाताण झाली. ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा वाढला असताना दिवसभराच्या स्पर्धांमुळे नवोदित खेळाडू जणू कोमेजून गेले. याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. या प्रकाराबद्दल मैदानावर उपस्थित पालकांमध्ये नाराजीचा सूर होता.
शालेय खेळाडूंच्या नोंदणीसाठी यंदा नवे पोर्टल सुरू केले होते. मात्र, यातील तांत्रिक अडचणीच्या गोंधळामुळे महत्त्वाचा अधिक कालावधी वाया गेला. परिणामी, जुन्या पोर्टलवरच पुन्हा नोंदणी करून गेल्या महिन्यात स्पर्धांचा नारळ फुटला; पण घाईगडबडीचे वेळापत्रक आणि गणेशोत्सवाच्या सुटीतही स्पर्धांमुळे खेळाडूंचा सहभाग घटला. विशेषतः मोजक्या खेळाडूंचा स्पर्धांत सहभाग असल्याने खेळाडूंची गोळाबेरीज करताना क्रीडा शिक्षकांची पळापळ सुरू आहे. आज शहरालगत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलात मैदानी आणि क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली; पण एकाचवेळी दोन खेळ सुरू राहिल्याने सर्वांनाच नियंत्रणासाठी कसरत करावी लागत होती.
त्यातच नव्याने साकारत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर अजूनही कामे सुरू आहेत. खासकरून निवाऱ्याची सोय अद्याप नसल्याने नवोदित खेळाडू शहरात आसरा शोधत फिरत असल्याचे पाहायला मिळाले. बहुंताशी खेळाडू मैदानाजवळ असणाऱ्या सागवानच्या छोट्या झाडांच्या सावलीत बसून होते. मुख्यत्वे गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा वाढला असताना दिवसभर सुरू असलेल्या खेळामुळे खेळाडूंची दमछाक झाल्याचे दिसले. सलग स्पर्धांमुळे दुखापती वाढून कामगिरीवर परिणाम झाल्याचे उपस्थित पालकांनी सांगितले. मध्यभागी फुटबॉल मैदानावर क्रिकेट, तर त्याभोवती ट्रॅकवर धावण्याच्या स्पर्धा एकाचवेळी सुरू असल्याने खेळाडूंच्या एकाग्रतेवर परिणाम झाला. त्याचा खेळाडूंना फटका बसला.
पाण्यासाठीही पळापळ करावी लागल्याच्या खेळाडूंच्या तक्रारी होत्या.
.................
चौकट...
पंचांची कसरत
एकाच मैदानावर मैदानी आणि क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. क्रिकेटपेक्षा मैदानी खेळात सहभागी खेळाडूंची अधिक संख्या होती. मध्यभागी क्रिकेट सुरू असल्याने मैदानी खेळाडूंना थांबण्यासाठी जागाच नसल्याने अडचण झाली. दोन्हीकडे काम करणाऱ्या पंचांचीही यामुळे कसरत झाली. दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू असणाऱ्या क्रीडा शिक्षकांना नियंत्रणासाठी मेहनत घ्यावी लागली.
.......................
कोट...
जिल्हास्तरीय स्पर्धांच्या तारखा जवळ आल्याने एकाच दिवशी दोन क्रीडा प्रकार घेतले. उद्या (ता. ६) केवळ मैदानी स्पर्धा होणार असून, उर्वरित क्रिकेट परवा होतील. या नियोजनाबद्दल क्रीडा शिक्षकांना विचारणा केली होती.
- विनायक नाईक, समन्वयक,
तालुका क्रीडा स्पर्धा, गडहिंग्लज
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.