फोटो - संग्रहित
पोलिसांवरील हल्ल्याने प्रशासनालाच आव्हान
इचलकरंजी परिसरातील सलग घटनांनी चिंता वाढली; कायद्याचा धाक कमी
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २० : शहरात मागील दोन महिन्यांत पोलिसांवर झालेल्या सलग हल्ल्यांच्या घटनांनी गंभीर चिंता वाढवली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचणाऱ्या पोलिसांनाच लक्ष्य केले जात असल्याने ही गुन्हेगारी प्रशासनालाच उघड आव्हान देणारी आहे. या वाढत्या घटनांमुळे शहरात कायद्याचा धाक कमी होत चालल्याचे चित्र समोर येत आहे.
कबनूर चौकातील घटनेत दोन गटांतील वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत पोलिस निरीक्षकासह तीन ते चार कर्मचाऱ्यांना जखमी केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड लागून तो रक्तबंबाळ झाला. या घटनांची धग शांत होण्याआधीच चंदूर येथे पुन्हा पोलिसांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले.
या सलग घटनांमुळे शहरात कायद्याची भीती संपत चालली आहे आणि झुंडशाही डोकेवर काढत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. वादविवादांचे स्वरूप क्षणार्धात हिंसक होत असून त्यात पोलिसच अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. पोलिसांच्या हस्तक्षेपाला विरोध करणे, त्यांना लक्ष्य करणे आणि जमावाच्या बळावर कायद्याला हरवण्याचा प्रयत्न करणे, ही नव्या प्रकारची गुन्हेगारी संस्कृती शहरात रुजत असल्याचे दिसत आहे.
स्थानिक पातळीवरील किरकोळ वादांना राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक प्रतिष्ठेचा रंग देत ते मोठ्या संघर्षात रूपांतरित केले जात आहेत. यातून कायदा हातात घेण्याची धोकादायक प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
अशा घटनांमुळे पोलिस दलावर मानसिक ताण तसेच त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांतही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एकूणच शहरातील पोलिसांवर उघडपणे होत असलेले हल्ले ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून शहराच्या सामाजिक शिस्तीलाही तडा जाण्याची गंभीर इशारा आहे.
---------
कठोर कलमे, तरीही जामीन
बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल होत असतानाही आरोपींना न्यायालयीन कोठडीनंतर सहज जामीन मिळत असल्याचे वास्तव समोर येत आहे. परिणामी कायद्याचा धाक कमी होत असून, पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसत आहे. कठोर कारवाईची गरज अधोरेखित होत असताना जामीन प्रक्रियेतील सुलभता हीच कायदा- सुव्यवस्थेसमोरील मोठी अडचण ठरत असल्याचे चित्र आहे.
------
सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याच्या हद्दीतच
राज्यात सलग दोन वर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच पोलिसांवरील हल्ल्याच्या तिन्ही सलग घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर केला आहे. एकामागून एक हल्ले होत असताना ‘ना कर, ना डर’ अशी निर्भय मानसिकता वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पोलिसांचा धाक कमी होत चालल्याचे स्पष्ट दिसत असून, वेळीच कठोर पावले न उचलल्यास ही प्रवृत्ती आणखी बळावण्याची भीती आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.