12870
इचलकरंजी : वसंत व्याख्यानमालेत बोलताना निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी.
--
‘ऑपरेशन सिंदूर’ युद्धनीतीसाठी नवा मापदंड ठरेल
निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी ः आपटे वाचन मंदिर वसंत व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : ‘ऑपरेशन सिंदूर’ने आधुनिक युद्धाचा पॅटर्न बदलून टाकला असून, भविष्यातील युद्धनीतीसाठी तो एक नवा मापदंड ठरणार आहे.
युद्ध कसे लढायचे आणि योग्य वेळी कोठे थांबायचे?, याचा आदर्श जगासमोर आला आहे. ही केवळ मर्यादित लष्करी कारवाई नसून, दहशतवादाविरोधातील दीर्घकालीन संघर्षाची नांदी आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (ठाणे) यांनी केले.
येथील आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेत सातव्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर त्या बोलत होत्या. अभ्यासपूर्ण आणि परखड मांडणीतून त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष, दहशतवाद आणि बदलत्या युद्धतंत्राचा वेध घेतला.
गर्गे-कुलकर्णी म्हणाल्या, ‘ब्रिटिश सत्ता भारतातून गेली; पण त्यांनी निर्माण केलेली फूट आणि संघर्षाची बिजे कायम ठेवली. भारताच्या फाळणीनंतर १९४७-४८ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला. प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला परतवून लावले; मात्र, थेट युद्धात भारताला हरवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. जिहादी विचारसरणी रुजवत स्वतंत्र काश्मीरच्या नावाखाली हिंदूविरोधी धर्मयुद्ध पुकारले आहे.
पंजाबमधील अमली पदार्थ तस्करीपासून सुरू झालेली ही दहशतवादी साखळी आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर हल्ल्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. आजचे युद्ध केवळ सीमारेषांवर लढले जात नाही, तर माहिती, तंत्रज्ञान आणि मानसिकतेच्या पातळीवरही लढले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये २०२४ मध्ये पर्यटनाचा विक्रम झाला असतानाच पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून प्रतिकाराचा अधिकार जपत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. सुडाच्या भावनेपेक्षा मुत्सद्देगिरी आणि नियोजनबद्ध रणनीतीच्या माध्यमातून भारताने योग्य प्रत्युत्तर दिले.
--
समाजात बुद्धिभेद
आणि दिशाभूल
सध्याच्या काळात दहशतवादी एखाद्या विशिष्ट वेशभूषेत दिसत नाहीत. समाजात मोठ्या प्रमाणात बुद्धिभेद आणि दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन निवृत्त मेजर मोहिनी यांनी केले.
------------
12870
JMH26B12870
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.